ग्रीन कॉरिडॉरमुळे स्थानिकांना रोजगारांची संधी; शेतकऱ्यांना जमिनीची किंमत वाढून मिळणार

By Appasaheb.patil | Published: July 2, 2022 04:33 PM2022-07-02T16:33:35+5:302022-07-02T16:33:40+5:30

सोलापूर जिल्ह्यातील २६ गावातील मोजणी पूर्ण; उर्वरित मोजणी ११ जुलैअखेर पूर्ण होणार

Green Corridor provides employment opportunities to locals; Farmers will get more land | ग्रीन कॉरिडॉरमुळे स्थानिकांना रोजगारांची संधी; शेतकऱ्यांना जमिनीची किंमत वाढून मिळणार

ग्रीन कॉरिडॉरमुळे स्थानिकांना रोजगारांची संधी; शेतकऱ्यांना जमिनीची किंमत वाढून मिळणार

Next

आप्पासाहेब पाटील

सोलापूर - सुरत-चेन्नई हे अंतर १२९० किमी असून हे अंतर जाण्यासाठी ३० तास लागत होते. या महामार्गामुळे आता १८ तासांत हे अंतर पार होणार आहे. ८२०० कोटींचा हा प्रकल्प असून महामार्गामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. जमिनींच्या किमती वाढून मिळणार आहेत. आतापर्यंत २६ गावांतील मोजणी पूर्ण झाली असून उर्वरित मोजणी ११ जुलैच्या आत पूर्ण होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

सुरत-चेन्नई हा महामार्ग ग्रीन कॉरिडॉर आहे. हा महामार्ग बार्शी तालुक्यातील १५ गावांतून, दक्षिण सोलापूर चार गावे आणि अक्कलकोट तालुक्यातील १६ अशा ३५ गावांतून महामार्ग जाणार होता. मात्र बार्शी तालुक्यात अजून घाणेगाव हे गाव वाढले आहे. महामार्गातील बार्शी तालुक्यातील सर्व गावाच्या जमिनीची मोजणी आज पूर्ण झाली. वाढलेल्या एका गावाची मोजणी सोमवारी पूर्ण होईल, दक्षिणमधील सर्व चारही गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. अक्कलकोट तालुक्यातील सहा गावांची आतापर्यंत मोजणी झाली आहे. मोजणीचे काम गतीने पूर्ण केल्याने सर्व टीमचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी कौतुक केले.

सुरत-चेन्नई नवीन महामार्गाच्या मोजणीबाबतच्या आढावा बैठकीला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, उपजिल्हाधिकारी तथा महामार्गाच्या सक्षम अधिकारी अरुणा गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक हेमंत सानप, अनिल विपत उपस्थित होते. तर वन, सार्वजनिक बांधकाम, भूमी अभिलेख विभागाचे प्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित होते.

------------

पंचनामे करताना काळजी घ्या

मोजणी करताना कोणाही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्या. पाईपलाईन, विहिरी फळबागा यांची माहिती घ्या. जिराईतचे क्षेत्र बागायत होता कामा नये, याची काळजी घ्या. झाडांची संख्या, इतर मालमत्ता याबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

----------

१५ जुलैपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करा

अक्कलकोट तालुका सोडला तर मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. मोजणी झालेल्या गावांचा मोजणीचा घोषवारा (जीएम शीट) प्रत्येकाने सादर करावा. यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने सहकार्य करावे. थ्रीडी अधिसूचना जाहीर करावयाची असल्याने सर्व विभागांनी समन्वयाने १५ जुलैपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना शंभरकर यांनी दिल्या.

-------------

१० रोअरमशीनद्वारे मोजणी

सुरत-चेन्नई महामार्गासाठी तिन्ही तालुक्यांतील जमिनीच्या मोजणीसाठी १० रोअर मशिन देण्यात आल्या होत्या. यामुळे ही मोजणी अचूकपणे करण्यात आली आहे. तिन्ही तालुक्यांतील एकूण ६४२.११०४ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. यामुळे सर्व संबंधित विभागांनी आपापली कामे रोखपणे पार पाडावीत. संबंधित विभागांनी मोजणीच्या वेळी उपस्थित राहून काम केले आहे, जेणेकरून मोजणी सुरू असतानाच पंचनामे, मूल्यांकन करणे सोपे झाले आहे, अशी माहिती शंभरकर यांनी दिली.

Web Title: Green Corridor provides employment opportunities to locals; Farmers will get more land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.