ग्रीन कॉरिडॉर यशस्वी; सोलापूरची किडनी अडीच तासात पोहोचली पुण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 05:44 PM2022-01-07T17:44:07+5:302022-01-07T17:44:36+5:30
‘रुबी’च्या रुग्णाला जीवनदान; सोलापुरातही रोपण
सोलापूर : कुंभारीचे अश्विनी सहकारी रुग्णालय ते पुण्यातील रुबी हॉस्पिटलदरम्यानचे २५० किलोमीटरचे अंतर रुग्णवाहिकेने अडीच तासांत पार केले. या रुग्णवाहिकेतून एक मूत्रपिंड तिथल्या एका रुग्णाला दान करण्यात आले. मूत्रपिंड पोहोचल्यानंतर काही वेळातच ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
शहरातील एका महिलेच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्यांचा मेंदू मृत (ब्रेन डेड) झाला होता. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या महिलेचा पती, मुलगा यांना याबाबत कल्पना होती. रुग्णाचा ब्रेन डेड झाल्यामुळे त्यांचे अवयव दुसऱ्या व्यक्तीस दिल्यास त्यांचा जीव वाचू शकतो. समुपदेशकांनी सांगितलेले त्यांना पटले. घरातील इतर सदस्यांशी चर्चा करून त्यांनी अवयव दान करण्यास संमती दिली.
डॉक्टरांच्या पथकाने महिलेची पूर्ण तपासणी केली. त्यानंतर झेडटीसीसी (झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिशन सेंटर) यांच्याशी संपर्क साधला. गरजेची सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. झेडटीसीसीच्या परवानगीनंतर मूत्रपिंड रोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन मूत्रपिंडांपैकी एक मूत्रपिंड सोलापुरातील एका रुग्णाला देण्यात आले, तर दुसरे पुण्याला रवाना करण्याचे ठरले. ब्रेन डेड झालेल्या रुग्णाचे डोळे जतन करण्यात आले आहेत.
शहर पोलीस आयुक्त हरिश बैजल हे कुंभारी येथील रुग्णालयात उपस्थित होते. सोलापूर पोलीस आयुक्तालय, सोलापूर ग्रामीण पोलीस, पुणे पोलीस यांच्या सहकार्याने सोलापूर ते पुणे ग्रीन कॉरिडॉर यशस्वी करण्यात आला. या दरम्यान रस्त्यावर इतर वाहने, व्यक्ती येऊ नये याची काळजी घेण्यात आली.
नागरिकांमध्ये ग्रीन कॉरिडॉरची उत्सुकता
कुंभारी येथील रुग्णालयापासून ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले. या दरम्यान शहर पोलीस मोठ्या संख्येने उभे होते. रुग्णवाहिकेच्या मध्ये काही आल्यास मूत्रपिंड पोहोचायला उशीर लागू शकतो. हे ओळखून पूर्ण तयारी करण्यात आली होती. रुग्णवाहिका जाण्याच्या १५ मिनिटे आधीच रस्ता रिकामा करण्यात आला होता. मात्र रस्ता रिकामा का करत आहेत याची माहीत नागरिकांना नव्हती. एका पोलिसाने ग्रीन कॉरिडॉर असल्याचे सांगितल्यानंतर त्याबद्दल अधिक माहिती घेण्याची उत्सुकता नागरिकांत दिसून आली.
या पथकाने केले प्रत्यारोपण
कुंभारी येथील रुग्णालयातील रुग्णाला मूत्रपिंड दान करण्याचे ठरले. त्यानुसार शस्त्रक्रिया यशस्वी झाली. डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. संदीप होळकर, डॉ. मयूर मस्तुद, डॉ. विठ्ठल कृष्णा, डॉ. देढीया यांच्या पथकाने ही कामगिरी केली. डॉ. आशिष तळे, डॉ. आदित्य पाटील यांनी मूत्रपिंड सुस्थित रहावे, यासाठीची काळजी घेतली.