सोलापुरातील नाना-नानी पार्कमधील हिरवळ हद्दपार; चिमुकल्यांच्या खेळण्यांची दुरवस्था, दारूच्या बाटल्यांचीही चलती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 03:10 PM2019-03-26T15:10:33+5:302019-03-26T15:12:53+5:30
अवकळा...उद्यानांची ! माणसांसाठीच्या बागेत शेळ्या-रेड्यांचा मुक्त वावर; महापालिकेला नाही सवड यांना घालण्यासाठी आवर
विलास जळकोटकर
सोलापूर: शहराचा गजबजलेला परिसर.. सात रस्ता चौकापासून चार-पाच मिनिटे अन् रंगभवन चौकापासून पाच-सात मिनिटांत अंतर कापणारा परिसर म्हणजे नाना-नानी पार्क उद्यान. रोडला लागूनच असलेलं हे उद्यान सायंकाळच्या वेळी प्रामुख्यानं नातवंडांसमवेत येणाºया आजी-आजोबांसाठीचं हक्काचं अन् विरंगुळ्याचं स्थान संबोधलं जातं. म्हणूनच की काय या उद्यानाला नाना-नानी पार्क नावानं ओळखलं जातं. पण सध्या माणसांसाठी असलेल्या या उद्यानामध्ये शेळ्या-रेड्यांचा मुक्त वावर दिसू लागला आहे. शिवाय चिमुकल्यांसाठीच्या खेळण्यांचीही दुरवस्था दिसून येत आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाला याकडे लक्ष देण्यास सवड नसल्याच्या भावना लोकांमध्ये उमटू लागल्या आहेत.
एकीकडे स्मार्ट सिटीच्या उपक्रमांतर्गत शहर सुंदर होण्यासाठी महापालिकेच्या वतीने वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जात असताना शहरामध्ये आहेत त्या उद्यानांची स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत नसल्याचं गाºहाणं लोकांमधून मांडलं जात आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने मुख्यत्वे शहरात महापालिकेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या उद्यानांकडं लक्ष पुरवले जावे, अशी भावनाही अनेकांनी व्यक्त केली.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नाना-नानी पार्क उद्यानाच्या विशाल प्रांगणामध्ये उंच मोठमोठी झाडे आणि त्यांची गर्द सावली यामुळे आजूबाजूच्या परिसरातील वयस्क मंडळी सायंकाळच्या वेळी विरंगुळा म्हणून येतात. सोबत लहान मुलंंही असतात. त्यांच्यासाठी जी खेळणी या उद्यानात बसवण्यात आली आहेत, त्यांची दुरवस्था झाली आहे. मोठी झाडे वगळता पाण्यामुळे हिरवळ नाहीशी झाली आहे. जिकडं तिकडं वाळून पांढरं झालेलं गवत दिसू लागलं आहे. महापालिकेकडील स्वतंत्र असलेल्या उद्यान विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सुजित कुलकर्णी, आशा गायकवाड, संजय विभूते, कीर्ती जोडमुटे, दिगंबर पारवे या मंडळींनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
या उद्यानाला चहूबाजूने कुंपण असूनही आबालवृद्धांसाठी असलेल्या उद्यानामध्ये कड्या-कोपºयाला असलेली हिरवळ, गवत चारण्यासाठी शेळ्या, रेड्यांची झुंड प्रवेशद्वाराच्या छोट्या गेटमधून नेली जाते. यासाठी त्यांना मज्जाव करणारेही कोणी दिसून येत नाही. एकीकडे चरणाºया या शेळ्या आणि दुसरीकडे दुपारी, रात्री अवैध कृत्येही येथे होत असल्याचे दिसते. बागेतल्या विविध कोपºयांच्या ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या दिसून आल्या. कोणीही या कुणी अडवणार नाही, विचारणार नाही अशी या उद्यानाची स्थिती झाली असल्याच्या प्रतिक्रियाही काहींनी नावे न सांगण्याच्या अटीवर प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.
गेल्या अनेक वर्षांपासून जोपासलेली मोठी झाडे या उद्यानाच्या सौंदर्यात भर टाकणारी आहेत. मात्र इथं कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे आहे त्या चांगल्या उद्यानाची अवस्था भयाण झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये रोटरी क्लबने ही बाग विकसित करून चांगले स्वरूप निर्माण केले होते. उद्यान विभागाने शहरातील सामाजिक संस्थांच्या साहाय्याने त्यांना प्रोत्साहित करून अशा बागांचा विकास करावा. गैरप्रकार टाळले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.
अन् शेळ्या-रेड्या काढल्या बाहेर
- उद्यानाच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या लोकमत चमूकडून कॅमेºयातून छायाचित्र टिपताना ज्यांनी उद्यानात शेळ्या आणल्या त्या मंडळींनी तातडीने शेळ्या-रेड्यांना हाकलून नेण्याचा प्रकारही दिसून आला. बागेत येणाºया-जाणाºया कोणांवरही इथे नियंत्रण नसल्याचे दिसून आले. दुपारच्या वेळी मुख्य प्रवेशद्वार बंद असते. तरीही किमान एका व्यक्तीला जाता येईल, अशा छोट्या गेटमधून बिनधास्तपणे शेळ्यांना आत नेले जाते आणि जेव्हा वाटेल तेव्हा परत नेले जाते. हे चित्र नित्याचे असल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले.
स्मार्ट सिटी-स्मार्ट उद्यान हवे
- शहर स्मार्ट होत असताना उद्यानेही स्मार्ट व्हावीत, यासाठी उद्यान विभागाने विशेष लक्ष द्यावे. शहरातल्या सर्व बागांची पाहणी करण्याचे आदेश आयुक्तांनी उद्यान विभागाला द्यावेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शहरातील विविध सामाजिक संस्था प्रयत्नशील आहेत. त्यांनाही यामध्ये सहभागी करून घेण्यात यावे. निश्चितच सकारात्मक प्रतिसाद मिळू शकेल, अशी अपेक्षा निसर्गप्रेमी, पर्यावरणवरती काम करणाºया अरविंद म्हेत्रे, मुकुंद शेटे, मनोज देवकर, पप्पू जमादार आदींनी व्यक्त केली.
दुपारी वामकुक्षीचं ठिकाण
४दुपारच्या वेळी झाडाखाली वामकुक्षी घेणं एवढंच याचं स्थान राहिल्याचं दिसून येत आहे. बच्चे कंपनींसाठी इथे निर्माण केलेल्या खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. त्याच्या डागडुजीकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. काही मंडळी उद्यानाचा कोपरा शोधून मद्यपान करीत एन्जॉय करीत असल्याचेही दिसून आले.