हरी पाहिला रे हरी पाहिला...!
By admin | Published: July 23, 2014 12:57 AM2014-07-23T00:57:37+5:302014-07-23T00:57:37+5:30
कामिका एकादशी: ७० हजार भाविकांची पंढरीत मांदियाळी
पंढरपूर : सावळ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढ महिन्यात येणाऱ्या कामिका एकादशीला आज पंढरीत ७० हजार भाविकांची मांदियाळी दिसून आली. स्नानासाठी चंद्रभागेत भाविकांची गर्दी झाली होती. पददर्शन रांग आठ गाळे भरून गोपाळपूर रस्त्यावरील गॅस गोडावूनपर्यंत पोहोचली होती. आषाढ महिन्यात ही एकादशी येत असल्याने दर्शन करून मंदिरातून बाहेर पडणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर ‘हरी पाहिला रे हरी पाहिला’ अशा भावना पाहावयास मिळाल्या.
दर्शनाच्या ओढीने मंदिर व चंद्रभागा वाळवंटाकडे जाणाऱ्या भाविकांमुळे पंढरीच्या सर्वच रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती. सकाळपासूनच पंढरपूर परिसरात रिमझिम पावसाची बरसात होती, यामुळे भाविकांना भिजतच पांडुरंगाचे दर्शन घ्यावे लागले. अशात आषाढी यात्रेसाठी चंद्रभागा नदीमध्ये सोडलेले उजनीचे पाणी सोलापूरसाठी पुढे वाहून गेल्याने चंद्रभागा नदी कोरडी पडली आहे. यामुळे चंद्रभागा स्नानासाठी भाविकांना मुबलक प्रमाणात पाणीच नव्हते. यामुळे त्यांना डबक्यात साचलेल्या पाण्यात डुबकी मारावी लागली. काहींनी कमी पाणी आणि तेही गढूळ असल्याने फक्त घोटेस्नान करणे पसंद केले.
पंढरीत येण्यासाठी व जाण्यासाठी बस व रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती तर काही भाविक खासगी वाहनानेही पंढरीत दाखल झाले आहेत. दशमी, एकादशी झाल्यानंतर काही भाविक तत्काळ परतीच्या मार्गाला लागले तर काही भाविक द्वादशीला कळस, मुख व नामदेव पायरीचे दर्शन घेऊन परत जाण्यासाठी पंढरीच्या मठ, मंदिर, धर्मशाळा व अन्य ठिकाणी मुक्कामी आहेत.
--------------------------
आॅनलाईनला चांगला प्रतिसाद
विठ्ठलभक्तांना झटपट दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीने आॅनलाईन दर्शनाची सोय केली असून, दोन दिवसांत ५ हजार ६०० भाविकांनी दर्शन घेतले. सोमवारी दिवसभर १ हजार १०० तर मंगळवारी एकादशी दिवशी ४ हजार ५०० भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा लाभ घेतला.