भूगर्भातील पाणीपातळीत दोन मीटरने वाढ, यंदा पाणीटंचाई भासणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:21 AM2021-03-21T04:21:14+5:302021-03-21T04:21:14+5:30
तालुक्यातील २७ गावांसाठी असणारी महत्त्वाची व्होळे प्रादेशिक पाणीपुरवठारी योजना व १६ गावांसाठी असणारी कव्हे पाणीपुरवठा योजनादेखील यंदा सुरू ...
तालुक्यातील २७ गावांसाठी असणारी महत्त्वाची व्होळे प्रादेशिक पाणीपुरवठारी योजना व १६ गावांसाठी असणारी कव्हे पाणीपुरवठा योजनादेखील यंदा सुरू होणार नसल्याचे दिसून येत आहे. कारण यंदा तालुक्यातील भूगर्भातील पाण्याच्या पातळी सरासरी अंदाजे दोन मीटरने वाढली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे यंदा कोणत्याही परिस्थितीत तालुक्यात पाण्याची टंचाई भासणार नसल्याने टँकर, बोअर व विहिरी अधिग्रहण करण्याचाही प्रश्न येत नसल्याचे येथील पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले.
पाण्यावर होणारा खर्च वाचणार
यंदा प्रथमच तालुक्यात पाण्यावर होणारा करोडो रुपयांचा निधी वाचणार आहे. त्यामुळे शासकीय स्तरावरून याबाबत कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही. उजनी धरण उशाला असले तरी दरवर्षी येथूनच पाण्याची टंचाई निर्माण झाली की करोडो रुपयांचा निधी पाण्यावर खर्च होत होता. परंतु यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे भूगर्भातील पाण्याची पातळीही वाढली आहे. त्यामुळे येथे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील सर्व विहिरी, बोअर, छोटे मोठे जलसाठे पाणी आहे. व्होळे व कव्हे पाणीपुरवठा योजनेवरही यंदा कोणत्याच प्रकारचा निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे तालुक्याला उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नसल्याने येथील सर्वसामान्य नागरिक समाधानी आहेत.
कोट :::::
मार्चएन्ड आला तरी अद्यापपर्यंत एकाही गावातून पाणीटंचाई बाबत मागणी अर्ज प्राप्त झालेला नाही. यंदा पाऊस पाणी चांगला झाल्याने भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. तालुक्यातील जलस्रोतांमध्ये पाणी मुलबक उपलब्ध आहे. त्यामुळे तालुक्याला भविष्यातही आणखी काही महिने पाणी टंचाई भासणार नाही.
- गफूर शेख,
उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, कुर्डूवाडी