समूह शेतीच शेतकºयाला वाचवू शकते - विजयकुमार बरबडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 02:28 PM2018-10-25T14:28:15+5:302018-10-25T14:32:11+5:30
शेतीचे तुकडे तुकडे झाल्याने शेती तोट्यात
बाळासाहेब बोचरे
सोलापूर: शासकीय धोरण म्हणून असो वा वडिलोपार्जित जमिनीच्या वाटण्या असोत, त्यामुळे शेतीचे छोटे-छोटे तुकडे पडले असून, त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला असल्याने शेती व्यवसाय घाट्यात आला आहे. अजूनही छोट्या-छोट्या शेतकºयांनी एकत्र येऊन समूह शेती केली तर उत्पादन खर्चात बचत होणार असल्याने हीच शेती देशाच्या बळीराजाला वाचवू शकते, असे प्रतिपादन कृषी तंत्र व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) प्रकल्प उपसंचालक विजयकुमार बरबडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच सोलापूर जिल्हा दौरा केला आहे. जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यापार्श्वभूमीवर आत्माच्या माध्यमातून दुष्काळावर कशी मात करता येईल याबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत.
प्रश्न: दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी ‘आत्मा’ची भूमिका काय आहे?
बरबडे: दुष्काळ असो वा सुकाळ ‘आत्मा’ ही यंत्रणा शेतकºयांना स्वयंपूर्ण करण्यासाठीच काम करत आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये चारा टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने चारा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ‘आत्मा’ वर सोपविली आहे. त्या माध्यमातून पाणी असलेल्या भागातील १५०० हेक्टर क्षेत्रात चारा लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी ११ तालुक्यांतील ६० ठिकाणे निवडण्यात आली आहेत.
प्रश्न : शेतकरी अल्पभूधारक का झाला?
बरबडे: शासनाने अल्पभूधारक शेतकºयांसाठी अनेक योजना दिल्याने शेतकºयांनी शेतीचे तुकडे पाडले. शिवाय वडिलोपार्जित शेतीच्या वाटण्या झाल्यामुळे मोठमोठे शेतकरीही आज अल्पभूधारक झाले आहेत. अल्पभूधारक शेतकºयांना मशागतीसाठी यंत्रे विकत घेणे किंवा बैलबारदाणा सांभाळणे परवडत नाही. त्यामुळे सध्या शेतकरी अडचणीत आहेत.
प्रश्न : समूह शेतीचे फायदे काय आहेत?
बरबडे: लागवडीपासून विक्रीपर्यंतच्या ज्या-ज्या अडचणी येतात त्या सामूहिकपणे सोडवल्या जातात. शिवाय मनुष्यबळ आणि खर्चाची बचत होते. खते, बियाणे खरेदी करताना सवलत मिळते. एकत्रितरित्या कीड व रोगाचे निर्मूलन शक्य होते. यासाठी शासनाकडून शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मोफत मिळते. शेतमाल बाजारात पाठवणे किंवा बाजारातून खते, बी-बियाणे आणणे खर्चिक होते. त्याऐवजी अनेक शेतकरी एकत्र आले तर उत्पादन खर्च हा शेतकºयांच्या संख्येमध्ये व क्षेत्रामध्ये विभागला गेल्याने तो निश्चित कमी येतो हा समूह शेतीचा फायदा आहे.
प्रश्न : प्रोत्साहन म्हणून शासनाच्या काय योजना आहेत?
बरबडे: समूह शेतीसाठी शासनाने अनेक योजना दिल्या असून, प्रकल्प मार्गदर्शन व प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या तांत्रिक मदतीबरोबरच विपणनासाठीही मार्गदर्शन केले जाते. किमान २० शेतकरी एकत्र येऊन त्यांनी शंभर एकरामध्ये एखादा प्रकल्प राबवला तर त्याला केंद्र व राज्य सरकारकडून अर्थसहाय्य मिळते. त्यामध्ये तीन कोटींच्या प्रकल्पासाठी एक कोटीचे अनुदान आहे. शिवाय समूहाला यांत्रिकीकरणासाठी ४० टक्के अनुदानावर ट्रॅक्टरसह अनेक अवजारे खरेदी करता येतात.
प्रश्न: जिल्ह्यात समूह शेतीला कसा प्रतिसाद आहे?
बरबडे: सोलापूर जिल्ह्यात ३५० शेतकरी समूहाची आत्माकडे नोंद आहे. त्यापैकी वडजी (ता. दक्षिण सोलापूर) येथे गुलाब फुलापासून गुलाब पाणी बनवण्याचा प्रकल्प चालू आहे. अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव येथे महिलांनी समूह शेती केली आहे. अरण (ता. माढा ) येथे सामूहिकरित्या सेंद्रिय शेती केली जाते. या शेतकºयांनी देशी गायींचे पालन केले आहे. कडधान्याचेही उत्पादन केले जाते. या पध्दतीने शेतकºयांनी एकत्र येऊन आपल्या विकासाचा मार्ग साधला आहे.