देशातील वाढती विषमता हीच देशातील मंदीचे कारण : अच्युत गोडबोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 02:14 PM2019-08-20T14:14:52+5:302019-08-20T14:18:32+5:30
‘लोकमत’ शी साधला संवाद; १ टक्के लोकांकडे आहे ५८ टक्के संपत्ती
सोलापूर : जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर याचा फायदा खूप कमी लोकांना झाला़ जागतिकीकरणामुळे आपले लक्ष फक्त शहराकडे गेले. यामुळे रोजगार वाढला नाही, जीडीपीमध्ये अपेक्षित वाढ झाली नाही़ यामुळेच बेकारी, विषमता, प्रदूषण हे तीन राक्षस निर्माण झाले. याचाच परिणाम विकासावर होत आहे़ आज देशात १ टक्के लोकांकडे ५८ टक्के संपत्ती आहे़ तर नऊ लोकांकडे असलेली संपत्ती देशातील ५० टक्के लोकांकडे असलेल्या संपत्तीपेक्षा जास्त आहे़ अशा घटकामुळे विषमता वाढत आहे़ ही वाढती विषमता ही मंदीचे कारण आहे असे मत साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.
हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वतीने किर्लोस्कर सभागृह येथे भारताची विकासनीती वास्तव व धोका या विषयावर लेखक अच्युत गोडबोले यांच्याशी संगणक अभ्यासक अतुल कहाते यांनी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर श्रीकांत येळेगावकर उपस्थित होते.
गोडबोले पुढे म्हणाले, शिक्षण, आरोग्य, रोजगार यांच्यावर पुरेसा खर्च करण्याबरोेबर वीज, पाणी आदी सुविधा सर्वांपर्यंत पोहोचवणे म्हणजे खरा सर्वांगीण विकास होय़ विकासामध्ये पर्यावरण हा खूप महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे़ विकासाकडे पाऊल ठेवताना आपण पर्यावरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ जागतिकीकरणाचा फायदा खूप कमी लोकांना झाला आहे़ सरकारी आकडेवारीनुसार देशात ८.१ टक्के लोक बेरोजगार आहेत़ पण रोजगार संबंधी खूप कमी लोक नाव नोंदणी करत असतात़ देशात ९३ टक्के असुरक्षित कामगार आहेत़ त्यांना उद्या आपण कुठे काम करणार आहेत याची माहितीही नसते. याचबरोबर आरोग्यासंबंधित जागृतीही नसणाºयांची संख्याही खूप कमी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
शिक्षणावर कमी खर्च ...
- शिक्षण, आरोग्य क्षेत्रात जीडीपीच्या तुलनेमध्ये कमी खर्च केल्यामुळे याचा फटका देशाला बसत आहे. यामुळेच देशातील ४१.५ टक्के लोक शाळेत कधी गेलेच नाहीत, ५८ टक्के महिला ३३ टक्के पुरुष कधीच शाळेला गेले नाहीत, शाळेचे शिक्षण पूर्ण केलेले १५.७ टक्के लोक आहेत. पदवीधर शिक्षण घेतलेले ४.५ टक्के लोक आहेत. द्विपदवीधर हे १.१ टक्के लोक आहेत तर २०१७ च्या आकडेवारीनुसार ७० टक्के शाळांमध्ये प्रयोगशाळा नाहीत. ४० टक्के शाळांमध्ये मैदान नाही, अशी माहिती अच्युत गोडबोले यांनी दिली.