ग्रामीणमध्ये वाढती रुग्णसंख्या चिंताजनक; ग्रामसमित्यांनी लढा उभारावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:19 AM2021-04-26T04:19:45+5:302021-04-26T04:19:45+5:30
सध्या तालुक्यात एक हजार बेडची क्षमता असताना ग्रामीण भागात दररोज २०० ते ३०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. ...
सध्या तालुक्यात एक हजार बेडची क्षमता असताना ग्रामीण भागात दररोज २०० ते ३०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. ही बाब चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी भोसे, खेडभोसे, पटवर्धन कुरोली आदी गावांमध्ये ग्रामसमित्या, आरोग्यसेवक, आशा सेविका, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कोरोना वॉरिअर्ससमवेत बैठक घेऊन कोरोनाचा आढावा घेतला. यावेळी सरपंच गणेश उपासे, उपसरपंच उज्ज्वला पिंजारी, माजी उपसरपंच ॲड. पांडुरंग नाईकनवरे, ॲड. संतोष नाईकनवरे, ग्रामविकास अधिकारी चंद्रशेखर गिड्डे, तलाठी जी. बी. गवळी, पोलीसपाटील गणेश जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी सचिन ढोले यांनी कोणत्या गावात किती ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. लॉकडाऊन केल्यानंतर रुग्ण वाढले की कमी झाले. त्यानंतर कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत, याबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या. हा व्हायरस रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी स्वत: जबाबदारी घेत एकमेकांचे संपर्क टाळावेत, जे सहकार्य करणार नाहीत त्यांची नावे पोलिसांना कळवावीत, असे आवाहन केले.
भविष्यात तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये साधारण २०० रुग्णांची सोय होईल अशी कोविड सेंटर उभारण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्यामुळे पंढरपूर शहरात आरोग्य सेवेवर असणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या तालुक्यात दररोज दोन हजारांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या घेऊन जास्तीत जास्त रुग्ण शोधून साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना यश येत असून, लवकरच रुग्णसंख्या कमी करण्यात यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लसीकरणावर भर देणार
पंढरपूर तालुक्यात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणात ज्यांनी लस घेतली आहे त्या नागरिकांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी आहे. असा निष्कर्ष आजपर्यंतच्या लसीकरणानंतर निघाला आहे. १ तारखेनंतर १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदणी करावी. त्या सर्वांना लस उपलब्ध करत भविष्यात जास्तीत जास्त लसीकरणावर भर देणार असल्याचे सचिन ढोले म्हणाले.
फोटो ओळी ::::::::::::::::::
पटवर्धन कुरोली येथील सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित बैठकीत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी सचिन ढोले. यावेळी सरपंच गणेश उपासे, पांडुरंग नाईकनवरे आदी उपस्थित होते.