जीएसटी रद्द तरीही ‘ गणपती बाप्पा’ महागच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:06 PM2018-08-13T12:06:14+5:302018-08-13T12:12:36+5:30
केंद्र सरकारच्या निर्णयाने यावर्षी गणेशभक्तांना दिलासा नाही
महेश कुलकर्णी
सोलापूर : केंद्र सरकारने गणेशमूर्तीवरील जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) पूर्णपणे रद्द करण्याची घोषणा रविवारी केली. या निर्णयाचा लाभ यावर्षी तरी सर्वसामान्य नागरिकांना होणार नाही. अनेक मूर्तिकारांनी जानेवारी ते मार्चदरम्यान गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणारे कच्चे साहित्य घेतल्याने यावर्षी किमती १० ते १५ टक्के वाढीव राहणार असल्याने यावर्षी तरी ‘बाप्पा’ महागच राहणार आहे.
केंद्र सरकारने अनेक वस्तूंवर जीएसटी लावल्याने गणेशमूर्तीच्या किमती गेल्या वर्षी वाढविण्यात आल्या होत्या. प्लॅस्टर आॅफ पॅरिस आणि रंग या दोन महत्त्वाच्या गोष्टींवर १८ आणि २८ टक्के जीएसटी लागू केल्यामुळे मूर्तिकारांनी १० ते १५ टक्के भाववाढ केली होती.
सर्वसामान्य गणेशभक्तांना घरी घेण्यासाठीची मूर्तीदेखील ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत नव्हती. गणेशोत्सव हा पारंपरिक सण असल्यामुळे केंद्र सरकारने मूर्तीवर जीएसटी पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या वर्षी केलेल्या भाववाढीमुळे अनेक मोठी मंडळे नाराज होती. यामुळे काही प्रमाणात मूर्ती मागणीवर परिणाम झाला होता. सोलापुरात ५०० च्या आसपास मूर्तीकार आहेत. एक लाखापेक्षा अधिक मूर्तींची निर्यात होते. जीएसटी लागण्याआधी प्लॅस्टर आॅफ पॅरिसचे एक पोते १६५ रुपयांना मिळायचे, ते जीएसटीनंतर १९० रुपयांना मिळते. यावर्षीही याच भावाने मूर्तिकारांनी साहित्य खरेदी केले आहे.
प्लॅस्टर आॅफ पॅरिसवर १८ टक्के जीएसटी लागल्याने मोठ्या गणेश मंडळांचे देखावेही महाग झाले होते. गणेशोत्सव महिन्यावर आल्याने अनेक मंडळांनी देखाव्याच्या आॅडर्स दिल्या आहेत. देखावा करणाºया कलावंतांनी कच्चे साहित्यदेखील आणले आहे. यामुळे जीएसटी रद्द केली तरी यावर्षी गणेशभक्तांना दिलासा मिळणार नाही.
सध्याचा जीएसटी
- प्लॅस्टर आॅफ पॅरिस - १८%
- पेंट, वारनीस - २८%
- एकूण मूर्तीकार - 300
- कारागीर - ५00
- सोलापुरात बनणाºया मूर्ती - १,५०,००००
सध्या गणपती बनवून तयार आहेत. काही मूर्ती मागणीप्रमाणे बाहेर पाठविल्या आहेत. त्यामुळे जीएसटी रद्द करण्याच्या निर्णयाने यावर्षी किमतीत काही फरक पडणार नाही. मुळातच वाढीव किमती देण्यास मंडळे विरोध करीत असल्यामुळे केंद्र सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.
- राजू गुंडला,
मूर्तीकार
मूर्ती बनविण्यासाठी लागणारे काही साहित्य आम्हाला पुणे आणि मुंबईहून मागवावे लागते. फ्लोरोसेंट कलर आणि वॉर्नीश हे रंग बाहेरून मागवावे लागतात. यावर्षी सर्व साहित्य खरेदी केल्याने मूर्तीची उत्पादन किंमत गेल्यावर्षी एवढीच राहणार आहे. पुढच्या वर्षी मात्र छोट्या मूर्ती ८० ते १०० रुपयांनी कमी होतील.
- मधुकर कोकुल
मूर्तीकार