गाळपाची हमी द्या अन्यथा गाळप परवाना नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:20 AM2021-05-16T04:20:55+5:302021-05-16T04:20:55+5:30
सोलापूर : को-२६५ जातीच्या उसाची नोंद नाकारू नका. शेतकऱ्यांकडून नोंदी घ्या, या जातीचा ऊस गाळण्याची हमी द्या, अन्यथा ...
सोलापूर : को-२६५ जातीच्या उसाची नोंद नाकारू नका. शेतकऱ्यांकडून नोंदी घ्या, या जातीचा ऊस गाळण्याची हमी द्या, अन्यथा येणाऱ्या गळीत हंगामासाठी गाळप परवाना दिला जाणार नाही, असा सज्जड इशारा देणारा आदेश साखर सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके यांनी राज्यातील साखर कारखान्यांना दिला आहे.
शेतकरी संघटनांनी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी को- २६५ या जातीच्या उसाचे गाळप कारखाने करीत नसल्याची तक्रार साखर आयुक्तालयाकडे केली आहे. कारखान्याच्या शेतकी विभागाकडून ऊस उत्पादकांना सातत्याने तशा सूचना आणि लागवड केल्यास ऊस गाळप करणार नाही, अशी धमकी दिली जात आहे. दोन वर्षापासून साखर कारखान्यांच्या भूमिकेने ऊस उत्पादक त्रस्त झाले आहेत. ऊस उत्पादकांनी साखर आयुक्तालयाकडे याबाबत सातत्याने तक्रारी केल्यानंतर आयुक्तालयाने या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे.
यापूर्वी १६ नोव्हेंबर २०१८ रोजी राज्यातील साखर कारखान्यांना को-२६५ जातीच्या उसाचे गाळप नाकारता येणार नसल्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही काही कारखाने नोंदी घेत नव्हते. साखर कारखान्यांची ही कृती शेतकऱ्यांच्या हिताची नाही. तसेच शासनाच्या धोरणाविरुद्ध असल्याची तंबी साखर आयुक्तालयाने वारंवार दिले आहे.
पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रात विकसित झालेल्या को-२६५ जातीच्या उसाची लागवड करण्यास महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केली आहे. शासनाची त्याला परवानगी असून, मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने हे वाण लागवडीसाठी आणि गाळपासाठी योग्य असल्याचे प्रमाणित केले आहे. याकडे लक्ष वेधत जे कारखाने को-२६५ जातीच्या ऊस लागवडीची नोंद घेणार नाहीत, त्यांना गाळप परवाना मिळणार नाही, असे आदेश काढल्याने राज्यातील साखर कारखानदारांच्या मनमानीला लगाम बसणार आहे.
---------
जिल्ह्यात १ लाख १० हजार हेक्टर को-२६५ जातीचा ऊस
सोलापूर जिल्ह्यात १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवडीची नोंद आहे. त्यातील नवीन लागवड आणि खोडवा मिळून जवळपास १ लाख १० हजार हेक्टर को-२६५ जातीचा ऊस आहे. जिल्ह्यातील साखर कारखाने याच जातीच्या उसावर अवलंबून आहेत. तरीही सिद्धेश्वरसह काही कारखान्यांनी नव्या ऊस लावणीचा आग्रह धरीत को-२६५ जातीच्या नोंदीला नकार दिला होता. परंतु उसाची उपलब्धता पाहून बहुतेक कारखान्यांनी नाईलाजाने यंदा गाळपाच्या सुरुवातीपासूनच को-२६५ जातीचा ऊस स्वीकारला आहे. हा ऊस स्वीकारला नाही, तर गाळप हंगाम अर्धवट सोडावा लागेल अशी स्थिती आहे.
------
को-२६५ जातीचा ऊस आम्हीही स्वीकारायला हरकत नाही. मात्र कमी मुदतीत गाळपाची सक्ती केली जाऊ नये. १६ ते १८ महिन्यांनी पक्व झाल्यानंतरच गाळप व्हायला हवे. आडसाली लागवड करावी लागेल. जानेवारीदरम्यान १६-१७ महिन्यांनी तोड करण्याची शेतकऱ्यांची तयारी हवी.
दत्ता शिंदे , चेअरमन, गोकुळ शुगर्स, धोत्री
-------
...याच जातीला शेतकऱ्यांचे प्राधान्य
कारखान्यांसाठी असलेली को-२६५ ही उसाची जात शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याची ठरली आहे. या उसाच्या कांड्याची जाडी जास्त आणि लांबी अधिक असल्याने ऊस वजनात जास्त भरतो. त्यांच्या मुळात आणि पानात पाणी शोषण्याची क्षमता अधिक आहे. कमी पाण्यावर ही जात तग धरते. खोडात पाणी साठवून ठेवते. १४ महिन्यांनंतर त्याला पक्वता येते. त्यामुळे या उसाची आडसाली लावण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली आहे. मात्र कमी काळात गाळप केल्यास साखर उतारा कमी मिळतो. कारखाने तोट्यात जातात. शेतकऱ्यांच्या उसाला कमी एफआरपी मिळते. दोघांचेही नुकसानच होते.
-------
सोलापूर जिल्ह्यात को-२६५ या जातीची सर्वाधिक लागवड होते. कारखानदारीसाठी ही जात घातक आहे. याच उसामुळे जिल्ह्यातील कारखानदारी झोपली आहे. त्याला जोपर्यंत हद्दपार करणार नाहीत तोपर्यंत कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारणार नाही.
- समीर सलगर, व्हाइस प्रेसिडेंट, ट्वेंटीवन शुगर ग्रुप, लातूर
---