पालकमंत्री गटाचा सोलापूर महानगरपालिका सर्वसाधारण सभेवर बहिष्कार, सभागृहाचे दरवाजे बंद करून स्थायी समिती सदस्यांची केली निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:29 PM2018-02-17T12:29:08+5:302018-02-17T12:29:48+5:30
सोलापूर महापालिकेची फेबु्रवारी महिन्यातील सर्वसाधारण सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार १७ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १२ वाजता सभा झाली़
सोलापूर आॅनलाइन लोकमत
सोलापूर दि १७ : सोलापूर महापालिकेची फेबु्रवारी महिन्यातील सर्वसाधारण सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार १७ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १२ वाजता सभा झाली़ या सभेत पालकमंत्री विजयकुमार देशमुख गटाचे सर्व सदस्यांनी या सभेवर बहिष्कार टाकला़ सभागृहाचे दरवाजे बंद करून शिवसेना व इतर विरोधी पक्षांच्या पाठिंब्याने महापौर शोभा बनशेट्टी यांनी स्थायी समिती सदस्य निवडीचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला़ यात भाजपाचे जुगुनभाई आंबेवाले, सुभाष शेजवाल, राजश्री कणके, विनायक विटकर, सेनेचे गणेश वानकर, भारत बडूरवाले, एमआयएमचे तौफिक शेख, राष्ट्रवादीचे किसन जाधव यांची निवड करण्यात आली़
प्रभारी सभागृहनेता कोण यावरून पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटात एकमत झाले नसल्याचे आजही दिसून आले़ पालकमंत्री गटाच्या उपमहापौर शशिकला बत्तुल यांच्यासह सर्व सदस्यांनी बहिष्कार टाकला़ महापौर शोभा बनशेट्टी यांनी विषय पत्रिकेवरील स्थायी समिती निवडीचा एकमेव विषय घेऊन दोन दिवंगतांना श्रध्दांजली वाहून सभा तहकुब केली़ यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सभागृहनेता सुरेश पाटील यांच्यावर झालेल्या उपचार खर्चासाठी मनपातर्फे २० लाख रूपये द्यावे व त्यांच्यावर झालेल्या विषबाधा प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी असा तातडीचा प्रस्ताव मांडला़ सदस्यांना तातडीचा प्रस्ताव मांडता येतो का असा आक्षेप विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी घेतला़ चर्चेअंती महापौर शोभा बनशेट्टी यांनी हा तातडीचा प्रस्ताव दाखल करून घेतला़ सभेचे कामकाज सुरू असताना पालकमंत्री गटाचे सदस्य सभागृहनेते यांच्या कार्यालयात बसून होते़