गुडेवारही गेले अन् शिस्तही गेली
By admin | Published: July 24, 2014 01:12 AM2014-07-24T01:12:08+5:302014-07-24T01:12:08+5:30
महापालिकेत रमत गमत येणाऱ्यांची संख्या वाढली : काहींना ड्रेसकोडचा पडला विसर
सोलापूर: आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली झाल्यापासून प्रशासनात आलेली शिस्त पुन्हा बिघडत चालली असून, सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचारी मोकाट झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सकाळी १० ची वेळ असताना ११ ते ११.३० पर्यंत रमत गमत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या पुन्हा वाढली असून, काहींना तर ड्रेसकोडचा पूर्णपणे विसर पडल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत कामाची अधिकृत वेळ आहे. असे असताना ‘जन सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणारे काही कर्मचारी आपल्या मर्जीप्रमाणे कामावर येत असल्याचे चित्र बुधवारी पाहावयास मिळत होते. बदली झालेले आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी प्रशासनात शिस्त आणली होती. शार्प १० वा. सर्व कर्मचारी आपल्या कार्यालयात हजर राहत होते. महापालिकेचे कर्मचारी ओळखता यावे म्हणून आयुक्तांनी ड्रेसकोड केला होता. त्यानुसार फिकट गुलाबी रंगाचा शर्ट आणि चॉकलेटी रंगाची पँट तसेच महिला कर्मचाऱ्यांनाही विशिष्ट रंगाच्या साडीचा गणवेश ठरवून देण्यात आला होता. त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी ओळखता येत होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये एक शिस्त दिसून येत होती. सकाळी १० वा. महापालिकेतील सर्व कार्यालयात काही बोटांवर मोजण्याइतके चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी सोडले तर एकाही टेबलावर अधिकारी, कर्मचारी दिसत नव्हते. सर्व कार्यालयातील टेबल रिकामे दिसत होते. आयुक्त कार्यालयाशेजारी असलेल्या सहायक आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या केबिनमध्ये कोणी नव्हते, त्यांच्या बाजूला असलेल्या कार्यालयात कोणीही अधिकारी दिसत नव्हता. दुसऱ्या मजल्यावर सहायक आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या कार्यालयात साफसफाई दिसत होती. १0.२0 वाजले तरी एकही अधिकारी टेबलवर दिसत नव्हते. आरोग्य मुख्य कार्यालयात काही एक-दोन कर्मचारी सोडले तर सर्व टेबल रिकामेच होते. १0.४0 झाले तरी ही स्थिती कायम होती. मुख्य लेखापाल, मुख्य लेखा परीक्षक कार्यालय, कर आकारणी व कर संकलन कार्यालय, शहर सुधारणा विभाग, नगर अभियंता कार्यालय, नगररचना विभाग, शहरी दारिद्र्य निर्मूलन कक्ष, नागरी समुदाय विकास प्रकल्प, अंतर्गत लेखा परीक्षक कार्यालय, विधान सल्लागार कार्यालय, सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालय, बांधकाम परवाना विभाग, नगर अभियंता कार्यालय, अस्थापना आदी प्रशासकीय इमारतीमधील कार्यालयात तुरळक प्रमाणात कर्मचारी दिसून येत होते.
जन्म-मृत्यू कार्यालयात फक्त एक ते दोनच कर्मचारी दिसत होते. मात्र या कार्यालयात कामानिमित्त आलेल्या लोकांची गर्दी दिसत होती. चंद्रकांत गुडेवार यांची १0 जून रोजी बदली झाली, त्यानंतर हळूहळू पुन्हा महापालिकेतील प्रशासनाला पुन्हा मरगळावस्था प्राप्त झाली आहे. वरिष्ठांचा धाक नसल्याने पुन्हा कर्मचारी आपल्या मर्जीप्रमाणे वागत असल्याने कामानिमित्त येणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत.