पाहुणे फ्लेमिंगो आता कायमचे झाले सोलापूरकर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:40 AM2018-10-31T11:40:52+5:302018-10-31T11:47:42+5:30
नवे थवे येणार : हिप्परगा, रामपूर तलाव, चिंचोली परिसरात वास्तव्य
मिलिंद राऊळ
सोलापूर: युरोप, आफ्रिका व पश्चिम आशियातून कच्छमार्गे सोलापुरात स्थलांतर करणारे फ्लेमिंगो पक्ष्याचे काही थवे आता कायमचे सोलापूरकर झाले असून, हिप्परगा तलाव, होटगी तलाव, रामपूर तलाव व चिंचोली एमआयडीसी परिसरात सध्या हे पक्षी वास्तव्यास आहेत.
पक्षीनिरीक्षक डॉ. व्यंकटेश मेतन यांनी सांगितले की, फ्लेमिंगोच्या काही माद्यांनी सोलापुरात अंडी दिले. पिलांचा जन्म होईपर्यंत त्यांना सोलापुरात राहणे गरजेचे होते. त्यामुळे काही फ्लेमिंगो येथेच राहिले. त्यांच्याबरोबर मग काही थवेही वास्तव्यास राहिले. या पक्ष्यांना सोलापुरातील निवास आणि आहार मानवल्यामुळे फ्लेमिंगोंचे सोलापूरकर होण्याचे प्रमाण वाढले आहे.
फ्लेमिंगो पक्षी चार ते पाच फूट उंचीचे व पंखावर गुलाबी रंगाच्या छटा असतात, हे पक्षी अत्यंत देखणे असतात, असे सांगून पक्षीतज्ज्ञ डॉ. निनाद शहा म्हणाले की, या पक्ष्याची पिले दोन वर्षांची होईपर्यंत पांढºया किंवा राखाडी रंगाची असतात. नंतर मात्र पंखावर गुलाबी छटा येते. मूळचा युरोपमधला असलेला अग्निपंख अर्थात फ्लेमिंगो भारतासह शेजारील देशात स्थलांतर करणारा पक्षी आहे.
मनमोहक विहार
- लांब, गुलाबी पाय व बोजड वाटणारी लांब मान, थोडी वाकलेली व मोडल्यासारखी दिसणारी चोंच ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. आकाशात विहार करताना या पक्ष्यांचा थवा अतिशय मनमोहक दिसतो. खारट, निमखारट पाण्यात हे पक्षी सतत वावरत असतात.