‘पर्ल्स’च्या संचालक, एजंटासह नऊजणांवर गुन्हा
By admin | Published: December 10, 2014 10:44 PM2014-12-10T22:44:48+5:302014-12-10T23:44:51+5:30
महाराष्ट्रातील पहिली तक्रार...
सातारा : मुदत संपलेल्या ठेवीचा परतावा न केल्याप्रकरणी ‘पर्ल्स’चे पाच संचालक, दोन एजंट आणि सातारा कार्यालयातील व्यवस्थापकासह सर्व कर्मचाऱ्यांच्या विरोधात बुधवारी रात्री उशिरा शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. याप्रकरणी पांडूरंग कृष्णाजी मोहिते (वय, ६६, रा. विसापूर, ता. खटाव) यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान, या अनुषंगाने अन्य एक तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पर्ल्सविरोधात ३.२५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे मोहिते यांनी नमूद केले आहे.
मोहिते यांनी तक्रारीत म्हटले आहे की, दि. १३ आॅगस्ट २00७ रोजी दस्तगीर शेख (रा. खातगुण, ता. खटाव) आणि मारुती साळुंखे (रा. विसापूर, ता. खटाव) माझ्या घरी आले. त्यांनी पर्ल्स’ची माहिती दिली आणि यामध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. यानंतर त्यांनी कंपनीचे संचालक तरलोचन सिंग, सुखदेव सिंग, गुरमित सिंग, सुब्रता भट्टाचार्य, प्रेमजित कांडा (सर्वजण सातवा मजला, गोपाळदास भवन, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली) यांनीही माझ्याशी फोनवर संपर्क साधून चांगल्या परताव्याची हमी दिली. त्यानंतर दि. १६ आॅगस्ट २00७ रोजी शेख आणि साळुंखे पुन्हा माझ्या घरी आले.
त्यांनी कंपनीची माहिती देत एकदा २0 हजार रुपये भरले की तुम्हाला दहा वर्षांत आमची कंपनी ७४,१३४ रुपये देईल, असे सांगितले. त्याप्रमाणे मोहिते यांनी प्रत्येकी २0 हजार रुपयांप्रमाणे पाच पावत्या केल्या आणि ‘पर्ल्स’मध्ये लाख रुपये गुंतवले. माझा मुलगा नवनाथ याने २0 हजार, भाचा संजय राऊत (आवी) याने १५ हजार आणि १0 हजार तर बहिण सावित्रीबाई कृष्णा खिलारे (वाठार किरोली) यांनी १५ हजार अशी रक्कम माझ्या सांगण्यानुसार शेख आणि साळुंखे या एजंटामार्फत सहा वर्ष मुदतपावती करून ठेवली. याची मुदत आॅगस्ट २0१४ मध्ये संपली आहे. आम्ही पैशाची मागणी केली असता त्याचा परतावा आम्हाला करण्यात आलेला नाही. मी सातारा कार्यालयात जावून पैसे मागितले असता नकार देण्यात आला. एजंट शेख आणि साळुंखे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. माझी याप्रकरणी फसवणूक झाली आहे. (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील पहिली तक्रार...
‘पर्ल्स’च्या विरोधात फसवणूकप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात दाखल झालेली महाराष्ट्रातील पहिली तक्रार आहे. ‘पर्ल्स’वर ‘एमपीआयडी अॅक्ट’प्रमाणे कारवाई करावी आणि ठेवीदारांना ठेवी परत मिळाव्यात अशी मागणी अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप, तात्या सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेले तीन दिवस झाले उपोषणास बसले आहेत.