गुजरातमधील खेड्यांचे चित्र आभासी ! पद्मश्री गणेश देवी यांचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 04:23 PM2018-03-30T16:23:42+5:302018-03-30T16:23:42+5:30

Guj cottage pictures virtual! Inspection of the Padmashree Ganesh Devi | गुजरातमधील खेड्यांचे चित्र आभासी ! पद्मश्री गणेश देवी यांचे निरीक्षण

गुजरातमधील खेड्यांचे चित्र आभासी ! पद्मश्री गणेश देवी यांचे निरीक्षण

Next
ठळक मुद्देदमाणी-पटेल प्रतिष्ठानचा कर्मयोगी पुरस्कार प्रदानसामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे यांचाही या पुरस्काराने गौरव

सोलापूर : गुजरातमधील खेड्यांच्या विकासाचेही जे चित्र रंगवले जात आहे ते आभासी असून, आदिवासी भागामधील विद्यार्थ्यांसाठी तेथे विद्यापीठीय आणि शाळांमध्ये विज्ञानही शिकविले जात नसे असे निरीक्षण दक्षिणायन चळवळीचे प्रमुख पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी आज येथे नोंदविले.

दमाणी-पटेल प्रतिष्ठानचा कर्मयोगी पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. प्रसिध्द अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे यांचाही या पुरस्काराने गौरव झाला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हे पुरस्कार प्रदान केले. प्रत्येकी ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफल असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपीनभाई पटेल, वात्रटिकाकार रामदास फुटाणे मंचावर होते.

डॉ. देवी म्हणाले की, खेड्यामध्ये माझा जन्म झाला. त्यावेळी सरकारचे शिक्षणासाठीचे धोरण चांगले होते. खासगीकरण झालेले नव्हते. त्यामुळे सरकारी मदतीवर पीएच. डी. पर्यंत शिक्षण झाले. योगी अरविंदांच्या कवितांवर संशोधन करून पीएच. डी. घेतली. अरविंदांप्रमाणेच गुजरात विद्यापीठात अध्यापन केले. इंग्लंडमध्ये जाऊनही शिकलो; पण मनातील खेडे जात नव्हते. त्यामुळे नोकरीचा राजीनामा देऊन गुजरातमधील खेड्यांमध्ये आदिवासींसाठी कार्य केले. आदिवासींच्या खेड्यांमध्ये कोणताही विकास झालेला नव्हता. स्वातंत्र्यानंतर त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे की आहे त्या स्थितीत जगू द्यायचे, याबाबतचा विचार झाला; पण त्यांना नेमके कसे जगायचे आहे, हे आदिवासींना कोणीच विचारले नाही. त्यामुळे त्यांना ज्या पध्दतीने जगायचे आहे तसे त्यांचे जगणे सुकर होण्यासाठी कार्य केले. त्यानंतर महाश्वेतादेवींबरोबर अनेक किलोमीटरचा प्रवास करून भटक्या विमुक्तांसाठी कार्य केले.

देशातील आणि आफ्रिकेतील मातृभाषा आणि बोलीभाषांसंदर्भात केलेल्या कामाबद्दल मनोगत व्यक्त केल्यानंतर डॉ. देवी यांनी देशातील स्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, दाभोळकरांवर काही अंतरावरून गोळ्या झाडल्या. गोविंद पानसरेंना घराच्या दारात मारले. कलबुर्गींचा तर घरात घुसून जीव घेतला. गौरी लंकेशची अशीच घराच्या अंगणात हत्या झाली. यावरून मारेकºयांचे धाडस कसे वाढत आहे, हे लक्षात येते. आता मी कलबुर्गींच्या गावात म्हणजे धारवाडमध्ये जाऊन ‘दक्षिणायन’ ही चळवळ राबवित आहे. अंधाराचा काळ दूर जाऊन नवीन पहाट कशी होईल, यासाठीची ही चळवळ असल्याचे ते म्हणाले.

अनासपुरे यांनी आपला नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील संघर्षाचा काळ सांगून ‘नाम’ फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. आयुष्यातील भ्रम जेव्हा संपला तेव्हा आपण कशासाठी आहोत, याची जाणीव झाली. यातूनच मी आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना काही आर्थिक मदत देऊ लागलो. एकदा नाना पाटेकरांनी मला पैसे देऊन मदत करायला सांगितली. नानाला प्रसिध्दी नको होती; पण मी नानाला आग्रह धरला. त्यामुळे नाना प्रत्येक उपक्रमासाठी येऊ लागले आणि ‘नाम’ फउंडेशनचे कार्य सुरू झाले, असे ते म्हणाले.
शिंदे यांनी आपल्या भाषणात डॉ. देवी आणि अनासपुरे यांच्या कार्याची प्रशंसा केली. या दोघांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगून ते म्हणाले की, या दोघांचीही आपल्या विचार आणि तत्त्वांवर निष्ठा आहे. त्यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला असल्याचे गौरवोद्गारही शिंदे यांनी काढले.प्रारंभी पटेल यांनी प्रास्ताविक केले. फुटाणे यांनी आभार मानले. ज्योती वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.

मकरंद अनासपुरे यांचे औदार्य
- मकरंद अनासपुरे यांनी आपल्या मनोगतानंतर पुरस्काराची रक्कम पारधी समाजाच्या कार्यासाठी देत असल्याचे जाहीर केले. त्यांनी दाखविलेल्या या औदार्याला सोलापूरकरांनी टाळ्यांनी दाद दिली. मोहोळ तालुक्यातील पारधी समाजासाठी सुरू केलेल्या भारतमाता प्रतिष्ठानला ५१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. या प्रतिष्ठानचे प्रमुख ज्ञानेश्वर भोसले यांनी तो स्वीकारला.

Web Title: Guj cottage pictures virtual! Inspection of the Padmashree Ganesh Devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.