गुलाल उधळला.. आता नगराध्यक्षपदाची उत्सुकता?, कधी होईल आरक्षण सोडत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 01:42 PM2022-01-21T13:42:59+5:302022-01-21T13:44:23+5:30
सोलापूरमधील नगरपंचायत निवडणुकांच्या निकालाकडे पाहिल्यास वैराग नगरपंचायती जर आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी लागले तर निरंजन भूमकर हे नगराध्यक्षपदाचे दावेदार ठरू शकतात
मुंबई - राज्यात बुधवारी पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकींच्या निकालानंतर आता सर्वांनाच प्रतिक्षा आहे ती नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीची. नगराध्यक्षपदासाठी प्रत्येक नगरपंचायतीच्या शहरात, गावात चांगलीच लॉबिंग आणि नवनवीन नावाचे चेहरे समोर येत आहेत. मात्र, नगराध्यक्षपदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी पडते यावरच या सर्वांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण पडले, तरच इच्छुकांना आनंद होई, अन्यथा पर्यायी नेता निवडावा लागणार आहे.
लोकांच्या मनातील नगराध्यक्ष
सोलापूरमधील नगरपंचायत निवडणुकांच्या निकालाकडे पाहिल्यास वैराग नगरपंचायती जर आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी लागले तर निरंजन भूमकर हे नगराध्यक्षपदाचे दावेदार ठरू शकतात. अन्यथा वेगळे चित्र दिसू शकते अशी चर्चा वैरागवासीयांमधून होत आहे. माढ्यातही अशीच स्थिती असू शकते. पूर्वनगराध्यक्षा असलेल्या ॲड. मीनल दादासाहेब साठे यांना पुन्हा संधी मिळू शकते, असा अनेकांचा व्होरा आहे.
माळशिरसमध्ये आप्पासाहेब देशमुख यांच्याच नावाची चर्चा आहे. मात्र महिलासाठी आरक्षण पडल्यास त्यांची पत्नी अर्चना देशमुख दावेदार ठरू शकतात. जर आरक्षण अनुसूचित जातीसाठी पडले तर पुरुषांमधून आबा धाईंजे तर महिलांमधून शोभा धाईंजे यांना संधी मिळू शकते. महाळूंग-श्रीपूरमध्ये दोन गट आहेत. नातेपुतेमध्ये सर्वसाधारण गटात आरक्षण पडल्यास मालोजीराव देशमुख आणि आरक्षण संवर्गातून आल्यास सुरेश सोरटे यांचे नाव आघाडीवर आहे. नगराध्यक्षाचे आरक्षण अद्याप पडलेले नाही त्यामुळे नेमका मान कुणाला मिळेल याबद्दल लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे.
असा होता निकाल
वैराग नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या निरंजन भूमकर गटाने १७ पैकी १३ जागेवर विजय मिळवला आहे.
माढा नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसने १२ जागांवर विजय मिळविला आहे, तर राष्ट्रवादी व शिवसेनेला प्रत्येकी दोन व अपक्ष एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
माळशिरस : नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १० जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळविले आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या दोन उमेदवारांनी यश मिळविले.
महाळुंग-श्रीपूर : नगरपंचायतीच्या निवडणुकीत मोहिते-पाटील गटाने १७ पैकी नऊ जागांवर मोहिते-पाटील गटाने विजय मिळविला आहे.
नातेपुते : नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या निकालात स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून जनशक्ती विकास आघाडीने १७ जागांपैकी ११ जागा जिंकल्या आहेत.
दरम्यान, जानेवारीअखेरपर्यंत नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यानंतर, नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम घेण्यात येईल, अशी माहिती प्रशासनातील सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे, या महिनाअखेपर्यंत आपल्या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते.