मराठवाड्यासोबत विदर्भही स्वतंत्र करू; छोट्या राज्यांशिवाय संपूर्ण विकास अशक्य - गुणरत्न सदावर्ते
By बाळकृष्ण दोड्डी | Published: November 25, 2022 04:46 PM2022-11-25T16:46:54+5:302022-11-25T16:47:21+5:30
मराठवाड्यासोबत विदर्भही स्वतंत्र करू छोट्या राज्यांशिवाय संपूर्ण विकास अशक्य असल्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले.
सोलापूर : छोट्या राज्यांशिवाय संपूर्ण मानवी विकास अशक्य असल्याचे मत ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील सरकार आपलं सरकार आहे. लाडकं सरकार आहे, असे सांगत मराठवाडा सोबत विदर्भही स्वतंत्र करू, असा दावाही त्यांनी सोलापुरात केला आहे. उस्मानाबाद येथील संवाद परिषदेला जाण्यापूर्वी ॲड. सदावर्ते यांनी सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधला. दुपारी बारा वाजता सोलापूर बस स्थानकावर त्यांचे आगमन झाले. एसटी कष्टकरी जनसंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे स्वागत झाले. यानंतर ते काही वेळ विश्रांतीसाठी येथील एका हॉटेलमध्ये थांबले. तेथून उस्मानाबाद ते रवाना झाले. त्यापूर्वी ते येथील पत्रकारांशी बातचीत केली. ते म्हणाले, मराठवाड्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. उस्मानाबाद येथील संवाद परिषदेला प्रशासनाने परवानगी दिली नाही. आमचे पोस्टर पाडले.
त्यामुळे आम्ही थांबणार नाही. कष्टकऱ्यांची चळवळ कधीच थांबणार नाही. संवाद परिषद घेऊच. स्वतंत्र मराठवाडा व विदर्भाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा विरोध आहे. ते बिळातले राजकारणी आहेत. १२४ एसटी कर्मचाऱ्यांचा जीव जाताना माजी मुख्यमंत्री ठाकरे हे घरात बसून होते. बिळात बसून राज्य करीत होते. आणि यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मूक समिती होती. त्यामुळे हे जनतेचे नेते नाहीत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.