गुरुजी अन् विद्यार्थीही सुटाबुटात; तिरवंडी, धर्मपुरी शाळेचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 10:58 AM2018-11-01T10:58:48+5:302018-11-01T11:01:07+5:30
ब्लेझरचा कपडा अन् शिलाईचा खर्च ३२ हजार ४०० रुपये लोकसहभागातून
माळशिरस : झेडपी शिक्षकांच्या गणवेशाबाबत अनेक दिवस चर्चेचे गुºहाळ सुरू आहे़ गणवेश कसा असावा, याबाबत शिक्षक संघटना व प्रशासनात चर्चा झाली, विरोधही झाला. अखेर चर्चेतून शिक्षकांना ब्लेझरचा गणवेश निश्चित केला, परंतु तिरवंडी (ता. माळशिरस) येथील बंडगरमळा झेडपी शाळेत तर चक्क जून २०१७ पासून तर धर्मपुरी येथील झेडपी शाळेत चालू शैक्षणिक वर्षापासून शिक्षक अन् विद्यार्थीही ब्लेझर वापरू लागले़ त्यामुळे प्रशासनाच्या संकल्पनेच्या एक पाऊल पुढे चालणाºया शाळेतील शिक्षक व विद्यार्थी आहेत़
झेडपी शिक्षकांचे गणवेशाबाबत गेल्या काही दिवसांपासून दावे प्रतिदावे सुरू आहेत. अखेर दिवाळीनंतर शिक्षकांना ब्लेझर निश्चित केला असला तरी आता वकील संघटनांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या गणवेशाचे काय होणार? हा प्रश्नच आहे.
शिक्षण विभागाने गणवेशासाठी १ कोटी २१ लाख रुपये निधी उपलब्ध केला; मात्र यात मोठ्या प्रमाणात लोकवर्गणी करून शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने शिक्षकांनी शाळेच्या भौतिक सुविधेबरोबरच विद्यार्थ्यांना टॉय, ओळखपत्र, स्पोटर््स गणवेश अशा विविध सुविधा होऊ लागल्या.
बंडगर मळा, धर्मपुरी या शाळेतील शिक्षकांची भविष्याचा वेध घेत झेडपीची मुले गुणवत्तेबरोबरच इंग्लिश स्कूलच्या तुलनेत कोठेही कमी पडू नयेत, याची काळजी घेतली़ त्यामुळे या शाळेत सध्या शिक्षक अन् विद्यार्थीही ब्लेझर वापरत असल्याचे दिसून येते.
बंडगरमळा येथे पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेत एकूण २८ विद्यार्थी व दोन शिक्षक ब्लेझरमध्ये येतात तर धर्मपुरी येथे पहिली ते सातवीपर्यंत शाळा असून २३३ पटसंख्या आहे.
राजेंद्र भारुड यांचीच संकल्पना
- डॉ़ राजेंद्र भारुड हे सोलापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ९ मे २०१७ मध्ये रुजू झाले़ त्यानंतर आनंदनगर ( अकलूज) येथे एक शिक्षकांचाच कार्यक्रम झाला़ या कार्यक्रमात ते सहज बोलून गेले की झेडपी शाळेचा शिक्षक अन् विद्यार्थी माझ्यासारख्या ब्लेझरमध्ये दिसला पाहिजे़ ही संकल्पना तिरवंडी येथील मुख्याध्यापक तुकाराम वाघमोडे यांना आवडली़ त्यांनी लागलीच शालेय समिती अध्यक्ष शामराव बंडगर यांना सांगितली़ त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली़ त्याचप्रमाणे धर्मपुरी येथील शिक्षकांनाही वाटू लागले़ इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी सुटाबुटात असतात़ मग आपला विद्यार्थी का नको़ विद्यार्थ्यांमध्ये गणवेशाविषयी उगीच न्यूनगंड नको म्हणून मुख्याध्यापक दत्तात्रय झेंडे आणि शालेय समिती अध्यक्ष विजय मसगुडेसह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.
दिवाळीनंतर गुरुजी होणार सर
- गुरुजी’ या शब्दाला एक वेगळी धार आहे़ पांढरे धोतर, मोठा भिंगाचा चष्मा, काखेत शबनम पिशवी, हातात पुस्तक असा पेहराव असलेली एक विद्वान व्यक्ती म्हणजे गुरुजी़ शासकीय निर्णयानुसार १९ नोव्हेंबरपासून छोतर, पायजमा, पॅन्ट वापरणारे ‘गुरुजी’ ब्लेझरवाले ‘सर’ होतील़ ‘बाई’ ऐवजी ‘मॅडम’ याच नावाने आता विद्यार्थ्यांना हाक मारावी लागणार आहे़