Breaking; पंढरपुरात २५ लाखांचा गुटखा जप्त; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 10:55 AM2020-10-03T10:55:40+5:302020-10-03T10:56:09+5:30
पंढरपूर पोलिसांच्या पत्रावरून अन्न औषध प्रशासनाची कारवाई
सोलापूर : अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांना पंढरपूर शहर पोलिस स्टेशन, पंढरपूर यांनी पत्रान्वये कळविल्यावरुन वरील स्थळी हजर होऊन पोलिसांनी पकडून ठेवलेल्या सागर दत्तात्रय महाजन (रा. नागझरवाडी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद व रविंद्र रामचंद्र दिवार, (रा. आळंद मातोबा, ता. हवेली, जि. पुणे) याच्याकडून वाहन क्र. एमएच १३ एसएफ ४१४६ व एमएच १२ क्यूंडब्ल्यू ०८५७ या वाहनातून विमल पान मसाला, व्ही १ तंबाखू, आरएमडी पानमसाला, एम सुगंधित तंबाखू इत्यादींचा एकूण २५ लाख १७ हजार ६०० रुपये किंमतीचा साठा अन्न पदार्थांच्या विक्रीसाठी वाहतूक करीत असल्याचे आढळुन आले.
सदर साठा जप्ती पंचनामा करून सील करून ताब्यात घेण्यात आला. आरोपी वाहन चालक सागर दत्तात्रय महाजन, रविंद्र रामचंद्र दिवार, योगेश काळभोर (साठा मालक), विष्णू प्रजापत (वाहन मालक), निलेश काळभोर (वाहन मालक) यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा शिक्षपात्र कलम ५९ व भा द वि कलम १८८, २७२, २७३,३२८, ३४ प्रमाणे पंढरपूर शहर पोलीस स्टेशन, पंढरपूर येथे सदर आरोपी प्रतिबंधित साठा कोठून आणला, कोणाला देणार होते, अजून कोठे साठा करून ठेवला आहे का, या व्यवसायातील भागीदार कोण आहे का याची माहिती मिळणे करिता सरकारतर्फे फिर्याद देण्यात आली आहे.
सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी सहाय्यक आयुक्त (अन्न). प्र. मा. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.
सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करावा, अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाईची पावले उचलण्यात येणार आहेत असे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी केले आहे.