कर्नाटकमार्गे पुण्याकडे निघालेला २८ लाखांचा गुटखा सांगोला पोलिसांनी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 12:19 PM2021-09-20T12:19:38+5:302021-09-20T12:21:21+5:30
सोलापूर ग्रामीण पोलिस अन् अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
सांगोला : कर्नाटक (अथनी) येथून सांगोला मार्गे पुण्याकडे जात असताना पोलीस अधिकारी व अन्न भेसळ व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे १० लाखांची दोन वाहने पकडून सुमारे २८ लाख ३७ हजार ३६० रुपयाचा प्रतिबंधित गुटखा पकडून जप्त केला. ही कारवाई रविवारी रात्री ११ ते ११:३० च्या दरम्यान सांगोला - महुद रोड वरील शिवणे व एखतपूर पाटी येथे करण्यात आली. पोलीस व अन्नभेसळ प्रशासन अधिकाऱ्यांनी एकाच रात्री एकाच रोडवर दोन ठिकाणी प्रतिबंधक गुटखा पकडल्याने चोरून गुटखा विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत
सांगोला पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, पोलीस उपनिरीक्षक राजगुरू, पोलीस नाईक बाबासाहेब पाटील, पोलीस नाईक कोरे पोलीस नाईक देवकते, पोलीस कॉन्स्टेबल गणेश मेटकरी यांनी सांगोला महुद रोड पेट्रोलिंग करताना शिवणे गावाजवळ एम एच-१२ एलटी-४३२८ या पिकअपमधून पुण्याकडे जाणारा १५ लाख १३हजार १२० रुपयांचा गुटखा पकडला.
अन्न व भेसळ प्रशासन सहाय्यक आयुक्त प्रदिप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अ.वाय. इलागोर व अन्न सुरक्षा अधिकारी उ.सु. भुसे रोडवर एखतपूर पाटीजवळ एम एच-१२-एस एक्स-१२४० अशोक लेलँड या टेम्पोतून १३ लाख २४ हजार २४० रुपयांचा गुटखा असा सुमारे २८ लाख ३७ हजार ३६० रुपयाचा गुटखा पकडला. या कारवाईत पोलिसांनी प्रवीण दत्तात्रय खांडेकर व चेतन दत्तात्रय खांडेकर तसेच बाबू धुळा काळे ( खैरणे ता. जत जि. सांगली) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.