संविधान आणि देश वाचविण्यासाठी "हात से हात जोडो" यात्रा सुरु केलीय - रमेश बागवे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 03:55 PM2023-01-29T15:55:51+5:302023-01-29T17:08:59+5:30
रमेश बागवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी 'हात से हात जोडो' अभियानाच्या नियोजन विषयी महत्वाची बैठक काँग्रेस भवन येथे आयोजित केली होती.
सोलापूर : देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापुर जिल्ह्याचे समन्वयक माजी मंत्री रमेश बागवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी 'हात से हात जोडो' अभियानाच्या नियोजन विषयी महत्वाची बैठक काँग्रेस भवन येथे आयोजित केली होती.
यावेळी बोलताना माजी मंत्री रमेश बागवे म्हणाले की, या देशात खोटे बोलून केंद्रात भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून महागाई, बेरोजगारी, जातीधर्मात तेढ आणि अराजकता वाढली आहे. सरकारी कंपन्या विकणे, उद्योगपतींचे कर्जे माफ करणे, मनुवादी विचार रुजविणे, स्वातंत्र्य, हिरावून घेणे, पत्रकारांवर माध्यमांवर दबाव, नोटबंदी आणि चुकीच्या पद्धतीने लागू केलेल्या जीएसटीमुळे छोटे उद्योग बंद पड़त आहेत. अशा प्रकारचे भाजपचे कारभार सुरु आहे. या विरुद्ध आवाज उचलणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे, संसदेत विरोधकांचे माईक बंद केले जात आहे. म्हणून लोकांच्या प्रश्नांना वाचा फोड़ण्यासाठी, सत्य लोकांपुढे मांडण्यासाठी राहुल गांधींनी 'भारत जोडो यात्रा' सुरु केली आणि त्यांस देशात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
आता भारत जोडो यात्रा शेवटच्या टप्प्यात आहे, या 'भारत जोडो' यात्रेचा संदेश, नऊ वर्षाचा मोदी सरकारचा अपयशी कारभार, त्यांच्यावरिल आरोपपत्र प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्यासाठी, संविधान आणि देश वाचविण्यासाठी 'हात से हात जोडो अभियान' सुरु केले आहे. त्यासाठी सुशीलकुमार शिंदे साहेब, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी अतिशय चांगले नियोजन केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली "हात से हात जोडो" यात्रा चांगल्या प्रकारे यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला.