राज्यात 'हातभट्टीमुक्त गाव' मोहीम; हॉटस्पॉट गावावर अचानक टाकणार धाडी
By Appasaheb.patil | Published: May 19, 2023 05:41 PM2023-05-19T17:41:42+5:302023-05-19T17:41:55+5:30
दरम्यान, हातभट्टी तयार करणारे, हातभट्टी दारुचे वाहतूकदार व विक्रेते यांचेवर विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.
सोलापूर : राज्यभरात “हातभट्टीमुक्त गाव” ही संकल्पना राबविण्याचा संकल्प केला असून त्याच अनुषंगाने सोलापुर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरातील हातभट्ट्या असलेल्या गावांची पोलीस स्टेशन निहाय यादी तयार केली आहे. विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अशा हातभट्टी हॉटस्पॉट ठिकाणांवर अचानकपणे छापे टाकून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सांगितले.
दरम्यान, हातभट्टी तयार करणारे, हातभट्टी दारुचे वाहतूकदार व विक्रेते यांचेवर विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारुविरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत असून अवैध दारु विक्री, निर्मिती, वाहतुकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागास कळवावे असे आवाहन केले आहे.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारुविरोधात सोलापूर जिल्हाभरात मोहिम तीव्र केली असून १ ते १९ मे कालावधीत हातभट्टी दारु निर्मिती, विक्री व वाहतुकीचे गुन्हे नोंदविले असून १८ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.