सोलापुरात सिद्धेश्वर महाराजांचा जयघोष; नंदीध्वज मिरवणुकीसह ६८ लिंगांना तैलाभिषेकास प्रारंभ
By Appasaheb.patil | Published: January 13, 2024 10:26 AM2024-01-13T10:26:22+5:302024-01-13T10:27:02+5:30
दुसऱ्या नंदीध्वजाचे हिरेहब्बू वाड्यात पुजन करण्यात आले.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : बोला बोला "एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्रर्र...सिद्धेश्वर महाराज की जय च्या जयघोषात शनिवारी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेस प्रारंभ झाला. शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाचे हिरेहब्बू वाड्यात पुजन करण्यात आले.
यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आ. विजयकुमार देशमुख यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी, मानकरी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी सात ही नंदीध्वजाची मिरवणूक निघाली. तब्बल ९०० वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा भक्तीभावात साजरी होत आहे. उद्या रविवार १४ जानेवारी रोजी यात्रेतील मुख्य सोहळा म्हणजेच अक्षता सोहळा समारंभ पार पडणार आहे.
दरम्यान, आज शनिवारी सकाळी परंपरेप्रमाणे मानाच्या हिरेहब्बू वाड्यातून श्री सिद्धेश्वरांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या सात नंदिध्वजांची मिरवणूक निघाली. सोलापूर शहर आणि परिसरात श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक करण्यास सुरुवात झाली आहे. या मिरवणुकीत पारंपरिक पोशाख असलेली बाराबंदी परिधान करून आबालवृद्ध सहभागी झाले होते.