सोलापूर शहरात १४०० दुकानातून केश कर्तनाचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 01:09 PM2019-07-17T13:09:04+5:302019-07-17T13:13:27+5:30
एसी केश कर्तनालयातही होतेय वाढ; नव्या बदलांना स्वीकारतोय नाभिक समाज
शितलकुमार कांबळे
सोलापूर : शहरात सुमारे एक हजार चारशे केश कर्तनालयामधून केश कर्तनाचे काम केले जाते. केश कर्तन करण्याचे काम हे नाभिक समाज बंधूच करतात. बलुतेदारीच्या काळामध्ये केश कर्तन करण्यासाठी कारागिरांना लोकांच्या घरोघरी जावे लागत असायचे. नाभिक बंधूंचा हा प्रवास हा आता एसी दुकानापर्यंत आला आहे. केश कर्तनासोबत इतर काही सेवा या दुकानातून दिल्या जातात.
आधुनिकीकरणाकडे जाणारा हा व्यवसाय वेगाने बदलत आहे. यात चांगली बाब म्हणजे सोलापुरातील नाभिक समाज बांधवही आधुनिक होत आहेत.
केश कर्तनाच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले असून, नाभिक समाजाने या बदलांना आपलंसं केलं आहे. २००२ मध्ये फक्त एका दुकानात एसी होता. आता याचीही संख्या ३५० पेक्षा अधिक झाली आहे. केश कर्तनालय चालविणाºयांना स्वच्छतेचे महत्त्व पटल्याने या व्यवसायात खूप बदल होत आहेत. ज्यांनी आपला व्यवसाय एका खोक्यातून सुरू केला होता, तेही आता चांगल्या पक्क्या दुकानात आपला व्यवसाय चालवित आहेत. दुकानात चांगल्या प्रकारचे फर्निचर, आरसे, केश कर्तन करण्यासाठी लागणारे अत्याधुनिक साधनेदेखील आता उपलब्ध आहेत. ज्या दुकानदारांना आधुनिकीकरण करताना अडचणी येतात, त्यांना संस्थेतर्फे मदत केली जाते.
संत सेना नाभिक समाज दुकानदार संंघ सेवाभावी संस्था शहरातील केश कर्तन दुकानदारांचे नेतृत्व करते.
शहरातील सर्व दुकानांसाठी नियमावली, दरपत्रके या संस्थेतर्फे ठरविण्यात येतात. सर्वच समाज बांधवांना व्यवसाय करताना ही संस्था काम करते. दोन दुकानांमध्ये २५० मीटर अंतर असावे, असा नियमही करण्यात आला आहे. यामुळे दुकानदारांमधील स्पर्धा कमी होऊन सर्वांनाच न्याय मिळेल, असा यामागचा उद्देश असतो. शहरात असणाºया एक हजार चारशे दुकानांमध्ये संवाद साधणे अवघड असल्याने १३ विभागीय पदाधिकाºयांची निवड करण्यात आली आहे.
नीलम नगर, विजापूर रोड, जुळे सोलापूर, एस.टी. स्टँड, अवंती नगर, नवी पेठ, माणिक चौक, अशोक चौक, पाथरुट चौक, मौलाली चौक, भवानी पेठ, कन्ना चौक असे एकूण १३ विभाग करण्यात आले आहेत.
अडीचशे मीटरचा नियम...
- दोन दुकानांमध्ये २५० मीटर अंतर असावे, असा नियमही करण्यात आला आहे. यामुळे दुकानदारांमधील स्पर्धा कमी होऊन सर्वांनाच न्याय मिळेल, असा यामागचा उद्देश असतो. शहरात असणाºया एक हजार चारशे दुकानांमध्ये संवाद साधणे अवघड असल्याने १३ विभागीय पदाधिकाºयांची निवड करण्यात आली आहे.
शहरातील मोजक्या व्यक्तींना चांगल्या पद्धतीने केश कर्तनाची सेवा मिळते, यावर विश्वास नसायचा. असे लोक पुण्यात जाऊन केस कापून येत होते. आता सोलापुरातील या व्यवसायात बदल झाला असून, ग्राहकांना चांगल्या सेवा देण्याबरोबरच नव्या व आकर्षक पद्धतीने केश कर्तन करण्याचे प्रशिक्षित कारागीर आपल्या शहरात काम करत आहेत. यामुळे पुण्यात केस कापायला जाणारे लोक आता तिथे जात नाहीत.
- संजय धोत्रे,
अध्यक्ष, संत सेना नाभिक दुकानदार संघ, सोलापूर.