अर्ध्यावर शिक्षण सोडणार होतो पण शिक्षकांनी माझी बाजू मांडली : संतोष शेलार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:34 PM2019-07-16T12:34:16+5:302019-07-16T12:36:43+5:30
गुरूपोर्णिमा विशेष; सोलापुरातील सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार याच्याशी संवाद
शीतलकुमार कांबळे
सोलापूर: घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मला शिकता येत नव्हते. शिक्षणासाठीचा खर्च भागविण्याची माझी ऐपत नव्हती म्हणून डिप्लोमाचे (तंत्रनिकेतन) शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, माझ्या शिक्षकांनी संस्थेमध्ये माझी बाजू मांडली. फक्त महाविद्यालयाचे शुल्क भरु शकत नाही म्हणून एका हुशार विद्यार्थ्याचे नुकसान व्हायला नको, असे म्हणत त्यांनी मला सवलत मिळवून दिली़ त्यामुळेच मी पुढे अभियांत्रिकीची पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करु शकलो, असा आपल्या शिक्षकांबद्दलचा अनुभव सोलापुरातील सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार यांनी सांगितला.
शेलार पुढे म्हणाले, शाळेपासूनच मी अभ्यासात चांगला होतो. नेहमी चांगल्या गुणाने उत्तीर्ण होत होतो. शालेय शिक्षण झाल्यावर मी सिव्हिल शाखेतून पदविकेच्या शिक्षणासाठी साताºयामधील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला.
आर्थिक अडचणीमुळे मी शिक्षण सोडण्याचे निश्चित केले होते. मात्र, प्रा. के. एस. शेख, प्रा. व्ही. एस. चिरमुले आणि प्रा. एम. एस गोपाळ यांनी माझे मन तर वळविलेच शिवाय महाविद्यालयात माझी बाजू मांडली. यामुळे मी शिकू शकलो, असेही ते यावेळी म्हणाले.
सिव्हिलमधील पदविका पूर्ण केल्यानंतर त्यांनी मला पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. यामुळेच मी सिव्हिलमधील पदवी व स्ट्रक्चरमधील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. या शिक्षकांनीच मला एमपीएससीची (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षा देण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यांच्या सल्ल्यामुळे मी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालो.
माझ्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला त्यांनी प्रोत्साहन दिले नसते तर मी जीवनात यशस्वी झालो नसतो. आताही मी माझ्या गुरुंच्या संपर्कात असतो. एखादी अडचण आली की त्यांच्याशी चर्चा करतो. ते आजही मला मार्गदर्शन करतात. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर खासगी कंपनीत काम करण्याऐवजी एमपीएसीच्या परीक्षेसाठी मी तयार झालो.
शिक्षकांनी आर्थिक मदतही केली
महाविद्यालयाच्या परीक्षेत माझी शैैक्षणिक प्रगती चांगली होती. याबद्दल शिक्षकांनाही चांगलेच माहीत होते. महाविद्यालय सोडण्याचे ठरविल्यानंतर त्यांनी आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शविली होती. तशी वेळ आल्यानंतर त्यांनी मला मदत केली. यामुळे मला महाविद्यालय शिक्षण पूर्ण करता आले. इतकेच नव्हे तर त्यामुळे पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मी आयुष्यात काहीतर करुन दाखवू शकलो.