कॉन्फरन्स अर्ध्यावरच; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे बोलण्याआधीच तुटला संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 01:12 PM2020-08-19T13:12:16+5:302020-08-19T13:22:02+5:30
ग्रामीणमधील मृत्यूदराबाबत विभागीय आयुक्तांनी व्यक्त केली चिंता; कोरोना उपाययोजनांचा घेतला आढावा
सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलण्याआधीच संपर्क तुटल्याने सोलापूरची कोरोना आढाव्याची बैठक अर्धवट राहिली. मात्र विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालात ग्रामीणमध्ये वाढत चाललेल्या मृत्यूदराबाबत चिंता व्यक्त केली आहे.
ठाकरे यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना उपाययोजनेचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून या कॉन्फरन्सला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, झेहपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अधीक्षक मनोज पाटील, शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव, सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉ. जयस्वाल आदी उपस्थित होते.
पुणे विभागातील स्थिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मांडली. विभागात ग्रामीणमध्ये कोरोनाचा मृत्यूदर वाढत चालल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ग्रामीण भागातील खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन ज्येष्ठ व्यक्ती व चिंताजनक रुग्णांवर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था करणे गरजेचे असल्याची त्यांनी सूचना केली. याबाबत जिल्हाधिकाºयांनी अहवाल मांडण्याआधीच संपर्क तुटल्याने सोलापूरची चर्चा अर्धवट राहिल्याचे सांगण्यात आले.
खासगी जागेची पाहणी
या आढाव्यानंतर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी उपस्थित अधिकाºयांबरोबर ग्रामीणमधील मृत्यूदर कमी करण्याबाबत चर्चा केली. सिव्हिल हॉस्पिटलकडे अन्य जिल्ह्यातून रुग्ण येत आहेत. त्याचबरोबर ग्रामीणमधील अनेक खासगी हॉस्पिटल ताब्यात घेऊन उपचाराची सोय करता येईल, असे सुचविण्यात आले. पोटफाडी चौकातील खासगी मंगल कार्यालय ताब्यात घेऊन तेथेही ग्रामीण रुग्णांसाठी कोरोना हॉस्पिटल सुरू करता येईल काय, याबाबत जिल्हाधिकाºयांनी पाहणी केली.
मृत्यूदर कमी करा: टोपे
कोरोनामुळे होणाºया मृत्यूचा राज्याचा दर ३.३५ टक्के आहे. पण मुंबई, नंदूरबार, सोलापूर, अकोला, लातूर, जळगाव, रत्नागिरी जिल्ह्याचा मृत्यूदर राज्याच्या सरासरीपेक्षा वाढला आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा, अशा सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या.