हमाल, माथाडी कामगारांचा मोर्चा; सोलापूर मार्केट यार्डातील लिलाव बंद
By दिपक दुपारगुडे | Published: October 5, 2023 06:01 PM2023-10-05T18:01:54+5:302023-10-05T18:02:08+5:30
गेल्या १० ते १५ वर्षांमध्ये शासनाने जिल्हा माथाडी मंडळाकडे अधिकारी, कर्मचारी यांच्या रिक्त जागी नवीन नेमणुका केलेल्या नाहीत.
सोलापूर : जिल्हा हमाल मापाडी माथाडी श्रमजीवी कामगार समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी कामगार आयुक्त कार्यालयावर हलगी मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिलाव गुरुवारी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे बाजार समितीच्या आवारात सुकसुकाट पाहायला मिळाला.
गेल्या १० ते १५ वर्षांमध्ये शासनाने जिल्हा माथाडी मंडळाकडे अधिकारी, कर्मचारी यांच्या रिक्त जागी नवीन नेमणुका केलेल्या नाहीत. जिल्हा माथाडी मंडळाकडे निरीक्षक व कर्मचारी यांची नव्याने भरती करताना जिल्हा माथाडी मंडळाकडील नोंदणीकृत हमाल-तोलाईदार महिला माथाडी कामगारांच्या मुला-मुलींची प्राधान्याने भरती करणे सक्तीचे करावे व त्यांची भरती करावी, जिल्हा माथाडी मंडळ सक्षम होण्यासाठी स्थानिक माथाडी मंडळावर शासन नियुक्त हमाल व मालक प्रतिनिधी सदस्य यांच्या त्वरित नियुक्त्या कराव्यात, माथाडी बोर्डाकडे नवीन नोंदणी कामगारांसाठी नोंदणी करण्यासाठी पंढरपूर येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातील अर्ज माथाडी मंडळाकडे दाखल केले असून, अजूनपर्यंत त्यांची नोंदणी केली नाही.
तरी ती त्वरित करून घेण्यात यावी, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व अडत व्यापाऱ्यांच्या - माथाडीत नोंदी करून घ्याव्यात, बाजार समितीमध्ये अडत व्यापाऱ्यांकडे बिगर नोंदीत कामगार काम करतात. हे कामगार माथाडी बोर्डात नोंदीत नसल्यामुळे या कामगारांचा माथाडीत भरणा होत नाही. कामगारांची लेव्ही बुडवून रोखीने पगार दिला जातो. त्यामुळे सर्व्हे करून बिगर नोंदीत कामगारांची माथाडीत नोंद करावी आदी मागण्यांचे निवेदन कामगार आयुक्तांना देण्यात आले.
यावेळी सोलापूर बाजार समितीचे संचालक शिवानंद पुजारी, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष राजकुमार घायाळ, जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, भीमा सीताफळे, संतोष सावंत, सुभाष लोमटे, राहुल सावंत, सुखदेव चव्हाण, सुरेश बागल, गोरख जगताप, सिद्धू हिप्परगी, दत्ता मुरूमकर, चांद गफार आदी उपस्थित होते.