‘विणकरांचे सोलापूर’ ही ओळख टिकविणारे राबते हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 02:32 PM2019-08-07T14:32:32+5:302019-08-07T14:35:06+5:30

राष्ट्रीय हातमाग दिन : रेशीम साड्या अन् विविध वस्त्र निर्मिती करणारे शहरात ५०० कारागीर

The hand that holds the identity of 'Weaver's Solapur' | ‘विणकरांचे सोलापूर’ ही ओळख टिकविणारे राबते हात

‘विणकरांचे सोलापूर’ ही ओळख टिकविणारे राबते हात

googlenewsNext
ठळक मुद्देहातमागावर वस्त्रनिर्मिती करणे हा पारंपरिक व्यवसाय असलेला हा विणकर समाज तेलंगणा, आंध्र, कर्नाटकातून १५० वर्षांपूर्वी सोलापुरात येऊन स्थायिक झालाआजही येथील  हातमागावर विणलेल्या ‘सोलापुरी रेशीम साडी  व पैठणी’ला संपूर्ण भारतात मागणी आहे‘विणकरांचे सोलापूर’ ही ओळख टिकून राहण्यासाठी धडपडणाºया विणकरांचे हात कुटुंबासह राबत आहेत

यशवंत सादूल

सोलापूर : हातमागावर वस्त्रनिर्मिती करणे हा पारंपरिक व्यवसाय असलेला हा विणकर समाज तेलंगणा, आंध्र, कर्नाटकातून १५० वर्षांपूर्वी सोलापुरात येऊन स्थायिक झाला. आजही येथील  हातमागावर विणलेल्या ‘सोलापुरी रेशीम साडी  व पैठणी’ला संपूर्ण भारतात मागणी आहे. अनेक अडचणींना  तोंड देत आपल्या पारंपरिक व्यवसायातून हातमागावर सुंदर वस्त्रनिर्मिती करून ‘विणकरांचे सोलापूर’ ही ओळख टिकून राहण्यासाठी धडपडणाºया विणकरांचे हात कुटुंबासह राबत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये युवकांचा सहभाग आहे. 

सोलापूरच्या जडणघडणीत स्वातंत्र्यपूर्व काळापासून विणकरांचे मोठे योगदान आहे. एकेकाळी गिरणगाव ही सोलापूरची ओळख हातमाग विणकरांमुळेच होती. सोन्याचा धूर निघणाºया सोलापुरात सर्वत्र हातमागांचा सटक-फटक हाच आवाज घुमत होता. औद्योगिकीकरणानंतर शहरात सर्वत्र यंत्रमागाची धडधड सुरू झाली. या गर्दीत आपला परंपरागत व्यवसाय टिकवून ठेवत त्यावर रेशीम साड्या व इतर वस्त्रनिर्मिती करणारे जवळपास पाचशे हातमाग आहेत. 

तीनशे कुटुंबांचा उदरनिर्वाह त्यावर चालतो. सोलापुरात तेलंगणातून आलेला पद्मशाली समाज व कर्नाटकातून आलेला कुरहिनशेट्टी समाजासह स्वकूळ साळी, तोगटवीर क्षत्रिय, निलगार, कोष्टी, देवांग, हटगार या समाजाचा हातमागावर वस्त्रनिर्मिती हा मुख्य व्यवसाय होता. 

शहरातील हातमाग.... 
- एकेकाळी घोंगडे वस्ती, दाजी पेठ, यल्लम्मा पेठ, साखर पेठ, रविवार पेठ, भावनाऋषी पेठ परिसरात असणारे हातमाग आज पूर्व भागात सर्वत्र विखुरले आहेत. विष्णुनगर ही सर्वात मोठी विणकरांची वसाहत असून, मुख्यत्वे रेशमी साड्या विणण्याचे काम इथे चालते. त्याबरोबरच विडी घरकूल, शेळगी, नीलम श्रमजीवी नगर, साईबाबा चौक, अशोक चौक, अक्कलकोट रोड एमआयडीसी, सुनील नगर, माळी नगर, बोलकोटे नगर, माधव नगर, यल्लालिंग नगर, वेणुगोपाल नगर, स्वागत नगर, गीता नगर, ललिता नगर, देसाई नगर या परिसरात हातमाग, भीममाग, वॉल हँगिंगद्वारे वस्त्रनिर्मिती करणारे हातमाग कारागीर विखुरलेले आहेत.

आनंद भास्कर रापोलू ....
- राज्यसभेचे सदस्य असलेले रापोलू यांना विणकरांबद्दल प्रचंड आस्था होती. आॅगस्ट २०१२ मध्ये विणकरांंच्या वेशभूषेत राजघाट ते लाल किल्ला अशी रॅली काढून सरकारचे लक्ष वेधून घेतले. मार्च २०१५ मध्ये राज्यसभेत प्रस्ताव मांडून पुन्हा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. रापोलू यांच्या प्रयत्नाला यश आले. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशी चळवळीने जोर धरला होता. ७ आॅगस्ट १९४५ रोजी चेन्नईत परदेशी कपड्यांची सर्वात मोठी होळी करण्यात आली. त्याच्या आठवणीनिमित्त ७ आॅगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील पहिल्या कार्यक्रमात केले.

हातमागावरील नवउत्पादने...
- हातमागावर सध्या ब्रोकेट डिझाईन साडी, बंगळुरू सिल्क पंजाबी ड्रेस मटेरियल यंदा हे नवीन उत्पादन हातमागावर विणले जात आहे.  संपूर्ण ब्रोकेट साडीवर जरीचे बारीक नक्षीकाम करण्यात येते. पती-पत्नी दोघे मिळून आठ दिवसात एक साडी विणतात. हा फॅन्सी साडीचा प्रकार असून, सध्या या साड्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारतभर पंजाबी ड्रेसची वाढती क्रे झ पाहता हातमागावर विणलेल्या बेंगळुरू सिल्क ड्रेस मटेरिअलला चांगली मागणी येत आहे. हातमागावर पारंपरिक पद्धतीने विणल्या जाणाºया साड्या, धोती, टॉवेलसोबत नवनवीन प्रकारची वस्त्रनिर्मिती केली जात आहे.

कारागिरांची सेवा...
- सध्या सर्वात वयस्कर असलेले ६० ते ६५ वर्षांचे सिद्राम अडव्यप्पा काकी हे माळी नगर येथे राहतात. वयाच्या दहाव्या वर्षापासून हातमागावर साड्या विणण्याच्या या व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली. सध्या त्यांची नजर क्षीण झाली तरी जिद्दीने सोलापुरी सिल्क साड्या विणतात. अंबादास मादगुंडी हे सर्वात लहान वयाचे विणकर आहेत. अवघे २४ वर्षांचे असलेले अंबादास पत्नी सुजाता यांच्यासोबत सिल्क साड्या विणण्याचे काम करीत युवकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. असे पस्तीस ते चाळीस युवक आपल्या सहचारिणीसोबत हातमागावर वस्त्रनिर्मिती करत आहेत़ 

परंपरागत व्यवसाय व स्वमालकीमुळे हातमाग व्यवसायात..
- सध्या विष्णू नगर या परिसरात हातमागाचे सटक-फटक आवाज मोठ्या प्रमाणात ऐकावयास मिळतात. यामध्ये खड्डामाग, भीममाग असे दोन प्रकार आहेत. खड्डामागावर बहुतांश प्रकारच्या साड्या विणल्या जातात. भीममागावर कॉटन साडी, टॉवेल, पंचा, बेडशीट, लुंगी आणि वॉलहँगिंग हा घरच्या व कार्यालयातील भिंती सुशोभित करणारा कलाप्रकार विणला जातो. वॉलहँगिंगला भारतभर तर मागणी आहे. परदेशातही मागणी आहे. शहरात जवळपास ५०० हातमाग आहेत. सगळ्यात जास्त २५० ते ३०० खड्डामाग आहेत. उर्वरित दोनशे भीममागांपैकी दीडशे मागांवर टॉवेल, लुंगी विणले जातात. जवळपास पन्नास मागावर वॉलहँगिंग विणले जातात.
- राजू काकी, अध्यक्ष, महात्मा विणकर संघ, सोलापूऱ 

Web Title: The hand that holds the identity of 'Weaver's Solapur'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.