शाईऐवजी हातांचे ठसे होणार संगणकीय; गुन्हेगारांसह पोलिसांचे हातही नाही काळपट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 10:48 AM2021-11-25T10:48:53+5:302021-11-25T10:48:58+5:30
ॲम्बिस प्रणाली होणार कार्यन्वित : देशासह राज्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती मिळणार काही वेळेत
सोलापूर : गुन्हेगाराची ओळख पटवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे हातांचे ठसे यापुढे कॉम्प्युटराइज्ड करण्यात येणार आहे. ऑटोमेटेड मल्टिमोडल बायोमेट्रिक्स आयडेंटिफिकेशन (ॲम्बिस) प्रणाली पोलीस ठाण्यात कार्यन्वित झाल्यानंतर गुन्हेगारांचे हात काळे होण्यापासून वाचणार आहेत. देशासह राज्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काही क्षणात मिळणार आहे.
एखाद्या गुन्ह्यानंतर संबंधित आरोपीचा माग काढण्यासाठी फिंगर प्रिंट विभागाची जबाबदारी महत्त्वाची असते. खून, दरोडा, घरफोडी, बलात्कार यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या हाताचे ठसे घेतले जातात. यासाठी फिंगर प्रिंट तज्ज्ञ असतात. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये यासाठी काही कर्मचारी नियुक्त केलेले असतात. सध्या, हाताचे ठसे कागदावर घेतले जातात. ॲम्बिस प्रणालीद्वारे हाताचे ठसे घेतल्यानंतर संबंधित फॉर्मवर त्या व्यक्तीची माहिती भरण्यात येईल. विशेष म्हणजे या माहितीची देवाणघेवाण सर्वच पोलीस स्टेशनला करणे सहज शक्य होईल.
राज्यातील ११६० पोलीस ठाणे सीसीटीएनएस सिस्टीमने जोडली असल्याने गुन्हेगारांचा माग काढणे आता पोलिसांना सुकर होणार आहे. इंटरपोल आणि एफबीआयच्या धर्तीवर पोलीस दलात हे युनिट कार्यान्वित करण्यात आले आहे. ऑटोमेटेड मल्टिमोडल बायोमेट्रिक्स आयडेंटिफिकेशन (ॲम्बिस) प्रणाली अद्ययावत करण्यात आली आहे. ‘ॲम्बिस’प्रणालीमध्ये अटक केलेल्या आरोपींचे चार प्रकारचे रेकॉर्ड घेतले जाते. प्रामुख्याने फिंगर प्रिंट (हाताचे ठसे), पाम प्रिंट (पंजाचे ठसे), आय स्कॅन (डोळ्यांचे स्कॅन) आणि फेस रीडिंग (चेहऱ्याचा फोटो) घेतला जाणार आहे. याआधारे घटनास्थळावरील भौतिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हेगाराचा माग काढला जाणार आहे. ही प्रणाली पोलीस तपासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
सध्या सीबीआय यंत्रणा उपलब्ध
० ॲम्बिस कार्यप्रणालीचा वापर सध्या सीबीआयच्या कार्यालयात केला जात आहे. सीबीआय फिंगर प्रिंटचा डेटा तयार करीत आहे. शहर पोलीस आयुक्तालय व ग्रामीण पाेलीस दलात ही कार्यप्रणाली अद्याप सुरू झाली नाही. सध्या सर्व पोलीस ठाण्यात कागदावर काळ्या शाईनेच हात व पायाचे ठसे घेतले जात आहेत.
एका क्लिकवर उपलब्ध होणार गुन्हेगारांची कुंडली
० गुन्हा जर रेकॉर्डवरील गुन्हेगाराने केला असेल, त्याचे ठसे जुळल्यास एका क्लिकवर गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती फिंगर प्रिंट विभागाकडून तपासी अधिकाऱ्याला प्राप्त होणार आहे. ‘ॲम्बिस’मुळे गुन्हेगारांची माहिती काही वेळात मिळेल. भौतिक पुराव्याच्या आधारे गुन्हेगारांचे निर्दोष होण्याचे प्रमाण घटून दोषसिद्धतेचे प्रमाण वाढणार आहे. भविष्यात एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याचा पूर्वीचा इतिहास एका क्लिकवर पोलिसांना मिळेल.
ॲम्बिस कार्यप्रणाली सुरू होऊन तीन वर्षे झाली, सध्या सीबीआय याचा डाटा तयार करीत आहे. भविष्यात ही कार्यप्रणाली पोलीस ठाण्यातही सुरू होईल. ॲम्बिसमुळे राज्यातील गुन्हेगाराची माहिती तत्काळ मिळणार आहे.
डाॅ. वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त