आधी आनंद... मग निराशा आता पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:16 AM2021-06-25T04:16:58+5:302021-06-25T04:16:58+5:30
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक तीव्र होती. त्यामुळे येथील शेतमजूर व शेतकऱ्यांना शेतीची कामे करता आली नव्हती. त्यानंतर ...
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक तीव्र होती. त्यामुळे येथील शेतमजूर व शेतकऱ्यांना शेतीची कामे करता आली नव्हती. त्यानंतर कोरोनाचाही प्रभाव कमी होत गेला. मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला. त्यामुळे खरीप पेरणीला आलेला वेग आता पुन्हा मंदावला असल्याने व पंधरा दिवसांखाली अनेकांनी नांगरणी, कुळवणी, रोटरणीची कामे पूर्ण करून तुरी, मूग, बाजरी, हुलगे, मटकी, सोयाबीन, मका याबरोबरच उडदाच्या पिकाची पेरणी सर्वाधिक सुरू केली होती. आता ती पूर्णत: थांबली आहे.
-----
पेरणी अनुदान द्या!
शेतकऱ्यांसाठी खरिपाचे पीक हे नगदी पीक आहे. त्याच्यावरच पुढील सर्व सणवार साजरे होतात; परंतु यावर्षी मृग नक्षत्रानेही दगा दिला. आता आर्द्रा नक्षत्र सुरू झाले आहे. मान्सूनपूर्व थोड्याफार भीजपावसामुळे पेरणीची आशा पल्लवित झाली होती. त्यामुळे अपुऱ्या वापशावर पेरण्याचे धाडस केले. त्यात बी-बियाणे चढ्या भावाने खरेदी केले आहे. आता पावसाने पाठ फिरवल्याने शेतात गुंतविलेले भांडवल निघेल का नाही, याबाबत भरोसा नाही. त्यामुळे शासनाने पेरणी मदत म्हणून अनुदान द्यावे, अशी मागणी जामगावचे शेतकरी श्रीकांत मुळे यांनी केली आहे.
----
मान्सूनपूर्व पावसानंतर सर्वत्र अपुरा पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या पेरण्या थांबविल्या आहेत. माढा तालुक्यात निम्म्या पेरण्या या मान्सूनपूर्व पाऊस पडल्यानंतर लगेच झाल्या होत्या. त्यानंतर मात्र पेरणी खोळंबली आहे. सर्वत्र बी-बियाणे व खते उपलब्ध आहेत. कोणाला समस्या निर्माण झाल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा.
-रवींद्र कांबळे, उपविभागीय कृषी अधिकारी, कुर्डूवाडी