रमजान का चाँद मुबारक; ईद-उल-फित्र कल होगी...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 07:56 PM2020-05-24T19:56:40+5:302020-05-24T20:10:45+5:30
सोलापूर शहरातील मशिदींवर विद्युत रोषणाई
सोलापूर : मुस्लिम धर्मियांचा पवित्र समजला जाणारा ईद-उल-फित्र (रमजान ईद) चा सण चंद्रदर्शन झाल्याने सोलापूरसह संपूर्ण राज्यात उद्या सोमवार, दि. २५ मे रोजी साजरा होणार आहे. उद्या रमजान ईद साजरी होणार असल्याने सोलापूर शहरातील मशिदींवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
चंद्रदर्शन झाल्याने २५ एप्रिलपासून रमजान महिन्याच्या पवित्र सणाला सुरुवात झाली. तेव्हापासून सोलापूर शहरातील मशिदींमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यंदा 'कोरोना' या महामारी आजारामुळे सामुदायिक नमाज पठण करण्यास बंदी घालण्यात आली होती. घरच्या घरी नमाज पठण करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते.
दरम्यान, दिवसभर कडकडीत उपवास ठेवल्यानंतर अल्लाहचे नामस्मरण करण्यात मुस्लिम धर्मीय मग्न होते. रविवारी सायंकाळनंतर चंद्रदर्शन झाल्याने अनेकांनी शुभेच्छा दिल्या. सोमवारी सकाळी रमजान ईद साजरी होणार असल्याची माहिती शहर काझी अमजद अली यांनी दिली. मुस्लिम बांधवांनी घरच्या घरीच नमाज पठाण करून एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन शहर काझी यांनी केले आहे.