हापूसचा भाव वधारला; कोकणनंतर कर्नाटकी आंब्याची मोठी आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2022 05:21 PM2022-05-03T17:21:36+5:302022-05-03T17:21:39+5:30
हापूस वधारला: अक्षय तृतीयेसाठी खरेदीसाठी झुंबड
सोलापूर : बाजारपेठेत यंदा स्थानिक आंबा दाखल झालेला नाही. कर्नाटकी बदाम व कोकणच्या हापूस आंब्याची आवक झाली असून, अक्षय तृतीयेनिमित्त भाव वाढल्याचे दिसून आले. यंदा हवामानातील बदलामुळे स्थानिक आंबे बाजारपेठेत अद्याप विक्रीस आलेले नाहीत.
अक्षय तृतीया डोळ्यासमोर ठेवून कोकणातील हापूस व कर्नाटकातील बदाम, पायरी, लालबाग असे ठराविकच आंबे विक्रीला आले आहेत. रत्नागिरी, देवगडच्या हापूसची पाच डझनला अडीच ते तीन हजार दराने विक्री झाली. कर्नाटकचा हापूस आंबाही बाजारात दाखल झाला आहे. पण हा आंबा स्वस्त असल्याने लोकांचा खरेदीकडे ओढा दिसून आला. कर्नाटकी हापूस ठोक दराने २३० रुपये डझन, तर किरकोळ विक्री अडीचशे रुपयांनी होत आहे. लालबाग १३० रुपये किलो दराने विकला जात आहे. बदाम ठोक दराने ८० रुपये, तर किरकोळ १०० रुपये किलोने विकला जात आहे. पायरी ४०० रु. डझन, कोकण हापूस ५०० ते ६०० रुपये डझनने विकला जात आहे. स्थानिक देशी आंब्याची कमी प्रमाणात आवक झाली असून, ८० ते २०० रुपये डझन भाव आहे. यंदा गावठी आंब्याची आवक झालेली नाही, असे मोहसीन बागवान यांनी सांगितले. ज्यांना हापूस घेणे परवडत नाही, असे लोक लालबाग, बदामला पसंती देतात, असे समीर मुजावर यांनी सांगितले.
पूजेला आंब्याचा मान
अक्षय तृतीयेच्या पूजेला आंब्याचा मान असतो. या पूजेनंतर आंबा व आमरस खाण्याला सुरुवात होते. दरवर्षी अक्षय तृतीयेला विविध प्रकाराचे आंबे विक्रीला येतात. पण, यंदा हवामान बदलामुळे आंब्याचे आगमन उशिरा झाले आहे, असे नंदा साठे यांनी सांगितले. स्थानिक आंबे कमी असल्याने कर्नाटक व हैदराबाद येथील आंब्याची आवक झाली आहे.
केशर बाजारात नाहीच
हापूसनंतर केशरला चांगली मागणी असते. सोलापूर जिल्ह्यात केशरची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. पण, यंदा केशरचा हंगाम उशिरा येत आहे. त्यामुळे बाजारात कुठेच केशर दिसत नाही. त्यामुळे लोकांचा हापूसच्या खरेदीकडे ओढा दिसून येत असल्याचे सद्दाम कुरेशी यांनी सांगितले. रत्नागिरी हापूस : ७००, देवगड : ६०० रुपये डझनने विकला जात आहे.