आठ कोटीच्या घरात राहण्याची लायकी नाही म्हणत विवाहितेचा छळ; लातूरमधील घटना
By Appasaheb.patil | Published: September 17, 2023 03:54 PM2023-09-17T15:54:12+5:302023-09-17T15:54:20+5:30
याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल कटारे करीत आहेत.
सोलापूर : लग्नात काही एक चांगले मानपान केले नाही, सोने-चांदीचे दागिने दिले नाहीत. आमचे आठ कोटींचे घर आहे, त्यात मोठमोठ्या साहित्याची गरज आहे, ते माहेरून आणण्यासाठी विवाहित महिलेस मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून शारीरिक त्रास दिला. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात पती, सासू, सासरे, नणंद, नणंदेचे पती याच्याविरोधात १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनंदा दत्तात्रय मदने (वय ३८, रा. राजहंसनगर, शिवाजीनगर, बाळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती दत्तात्रय मदने, सासू कलावती मदने, सासरे व्यंकटराव मदने (रा. मदने निवास, दयाराम रोड, लातूर) व नणंद शीतल खताळ पाटील, नणंदेचे पती ऋषिकेश खताळ पाटील (रा. नळदुर्ग, धाराशिव, सध्या - पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनंदा मदने या सासरी नांदत असताना पती, सासू, सासरे, नणंद व नणंदेच्या पतीने फिर्यादी सुनंदा हीस लग्नात काही एक मानपान केला नाही, आम्ही पैसे खर्च केलेले आहेत, तुझ्या आई-भावांनी काही हुंडा दिला नाही, तू आमच्या घरात नांदण्याचे लायकीची नाही, आमचे आठ कोटींचे घर आहे, त्यात मोठमोठ्या साहित्याची गरज आहे, ते तुझ्या माहेरून मागून घे नाहीतर आमच्याकडे नांदण्यास येऊ नको म्हणून मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून फिर्यादीस मानसिक व शारीरिक त्रास देऊन जाचहाट केला आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल कटारे करीत आहेत.