कष्टानं पिकवलेलं पिवळं सोनं बाजारात आलं अन् भाव पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:25 AM2021-09-22T04:25:47+5:302021-09-22T04:25:47+5:30
बार्शी बाजारात गणेशोत्सवाच्या काळात यंदाच्या हंगामातील सोयाबीनची आवक सुरु झाली. पहिल्याच दिवशी ११ हजार ५११ रुपये क्विंटलने सोयाबीन विकले ...
बार्शी बाजारात गणेशोत्सवाच्या काळात यंदाच्या हंगामातील सोयाबीनची आवक सुरु झाली. पहिल्याच दिवशी ११ हजार ५११ रुपये क्विंटलने सोयाबीन विकले गेले. त्याच दिवशी जवळपास आठ ते साडेआठ हजार रुपये दर होता. मात्र केवळ आठ दिवसात हे दर साडेतीन ते सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. म्हणजेच जवळपास पाच हजार रुपयांनी दर तुटले आहेत. आता खऱ्या अर्थाने सोयाबीनची काढणी सुरु झाली आहे. नेमका शेतकऱ्यांचा माल बाजारात येण्याच्या वेळीच हे दर खाली आले आहेत. त्यामुळे बळीराजा हिरमुसला आहे.
उडीदाची परिस्थिती याहून वाईट
बार्शीच्या बाजार समितीत दहा हजार कट्टे सोयाबीनची आवक आहे. उडीदाची तर यापेक्षा वाईट स्थिती आहे. बाजारात पाच ते सात हजार कट्टे आवक आहे. मात्र दर ३ ते ७ हजार रुपये मिळत आहे. यातील केवळ २०० ते ५०० कट्टे माल हा सात हजार रुपयांनी विकला जात आहे. उर्वरित माल हा पावसामध्ये भिजून डागील झाला असल्याने या उडीदाला ३५०० ते ४००० रुपये दर मिळत आहे. ज्चारीची पाच ते सहा हजार कट्टे आवक असून दर १२०० -२१००-३००० रुपये मिळत आहे.
केवळ केंद्राच्या धोरणामुळे भाव आले खाली
ज्यावेळी शेतकरी आणि व्यापारी या दोघांकडेही सोयाबीनचा माल नव्हता. त्यावेळी मात्र सोयाबीनला ९ ते ११ हजार रुपये दर होता. प्रत्यक्षात माल आला तेव्हा हे दर खाली का आले याविषयी बोलताना खरेदीदार सचिन मडके म्हणाले की, केंद्र सरकारने सोयाबीनची आवक करण्याचा निर्णय घेतला. तसेच पाम तेलावरील आयात शुल्क कमी केले. त्यामुळे हे सोयाबीनचे दर घसरले आहेत. याला पूर्णता केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे.
----
आयात थांबल्यास दर वाढतील
शेतकऱ्यांनी माल झाला की लगेच बाजारात विक्रीसाठी आणण्याची घाई करु नये. जोपर्यंत दर वाढत नाहीत तोपर्यंत वाट पाहावी. केंद्राने आयात थांबवल्यास दर निश्चित वाढतील, असे जाणकार व्यापारी म्हणत आहेत. यावर्षी जास्तीच्या पावसामुळे उडीदासोबतच सोयाबीनचे देखील खूप नुकसान झाले आहे. आता तरी पाऊस थांबणे गरजेचे आहे़.
----