बनावट हाॅल तिकीटद्वारे दहावीची परीक्षा देणाऱ्या डमी स्टुडंटला तीन वर्षे सक्तमजुरी
By विलास जळकोटकर | Published: January 6, 2024 06:12 PM2024-01-06T18:12:07+5:302024-01-06T18:16:02+5:30
सोलापूर : दहावीच्या बोर्ड परीक्षेला मुळ विद्यार्थ्याऐवजी त्रयस्ताला बनावट हॉलतिकिट बनवून परीक्षा दिल्याप्रकरणी तोतया विद्यार्थ्याला मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी ...
सोलापूर : दहावीच्या बोर्ड परीक्षेला मुळ विद्यार्थ्याऐवजी त्रयस्ताला बनावट हॉलतिकिट बनवून परीक्षा दिल्याप्रकरणी तोतया विद्यार्थ्याला मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. मल्लिनाथ शिवानंद वाले (रा. कमलानगर, विजापूर रोड, सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. या खटल्यातील अन्य एक आरोपी नितीन नारायणसिंग हा खटल्यादरम्यान मयत झालेला असल्याने त्याचा खटला बंद करण्यात आला. घटनेनंतर तब्बल २५ वर्षानंतर या खटल्याचा शुक्रवारी निकाल लागला.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, यातील आरोपी नितीन नारायणसिंग हजारे व मल्लिनाथ शिवानंद वाले (रा. कलानगर, विजापूर रोड, सोलापर) यांच्या विरोधात सिद्धेश्वर कन्या प्रशालेत १९९९ साली कार्यरत असलेल्या केंद्रप्रमुख शैलजा रणभारे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्ळात फिर्याद दाखल केली होती.
सदर घटनेमध्ये १७ मार्च १९९९ रोजी नितीन हजारे व मल्लिनाथ वाले यांनी चंद्रभागाबाई यलगुलवार शाळेचा बनावट शिक्का व ओळखपत्र तयार करुन दहावीच्या परीक्षेसाठी हालतिकिट तयार केले. त्यावर तत्कालिन मुख्याध्यापिका अनुगीता पवार यांची बनावट सही केली. आरोपी क्रमांक १ नितीन याचा फोटो काढून त्या ठिकाणी मल्लिनाथ याचा चिटकवला. त्यानंतर आरोपी २ मल्लिनाथ वाले हा इतिहास -भूगोल विषयाचा पेपर देताना १७ मार्च १९९९ रोजी फिर्यादी केंद्रप्रमुख शैलजा रणभारे यांच्या निदर्शनास आला. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका पवार, ब्लॉक सुपरवायझर एम. बी. मनोरे यांच्याकडे चौकशी करुन फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली होती.
तपास अधिकारी गजानन शिंदे यांनी आरोपीकडून शाळेचे बनावट शिक्के, सह्यांचे नमुने घेऊन हस्ताक्षर तज्ञाकडे पाठवले. त्यात आरोपींनी गुन्हा केल्याचे सिद्ध होताच न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकार पक्षाकडून ॲड. अमर डोके यांनी तर आरोपीकडून ॲड. गडदे व कांबळे यांनी काम पाहिले.
पाच जणांच्या नोंदवल्या साक्षी
या खटल्याच्या सुनावणीत कोर्टाने पाच जणांच्या साक्षी नोंदवल्या. त्यात दोन्ही आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या द्वारे गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने सरकार पक्ष व आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन मल्लिनाथ वाले यास तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व दंडाची शिक्षा सुनावली. यातील अन्य आरोपी नितीन हजारे हा खटल्यादरम्यान मयत झाल्यामुळे त्याचा खटला बंद करण्यात आला.
२५ वर्षे कालावधी
हा गुन्हा १७ मार्च १९९९ रोजी घडला होता. पोलिसांच्या तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. त्यानंतर अनेक कायदेशीर बाबींच्या सोपस्कारानंतर निकाल लागण्यास २०२४ साल उजाडले.