कष्टाने घर बांधले, जिलेटीनच्या स्फोटाने चिरले; जीव मुठीत घेऊन राहतोय मला न्याय द्या!
By संताजी शिंदे | Published: March 31, 2023 05:52 PM2023-03-31T17:52:47+5:302023-03-31T17:53:55+5:30
विजयानंद पांडुरंग हक्के असे उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचे नाव
संताजी शिंदे, सोलापूर: मोठ्या कष्टाने मी घर बांधले आहे, मात्र काही अंतरावरच सुरू असलेल्या बेकायदेशीर क्रशरमध्ये दररोज जिलेटीनचा स्फोट होत आहे. त्यामुळे माझ्या घराला चिरा पडल्या असून ते कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा प्रकार थांबवण्यात यावा, घराची नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी पुनम गेट जवळ बेमुदत उपोषण करीत आहे.
विजयानंद पांडुरंग हक्के (रा. पेळे ता. पंढरपूर जि. सोलापूर) असे उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते कुटुंबियांसमवेत पेळे येथे राहतात, काही अंतारवारच बेकायदेशीर क्रशर आहे. रात्री अपरात्री तेथे जिलेटिन व अन्य स्फोटकांचा वापर करून ब्लास्ट केला जातो. ब्लास्ट हाेत असल्याने त्याचे हदरे बसून माझ्या घराला तडे गेले आहेत. तडे गेल्याने माझे घर कधीही कोसळू शकते. या बाबत मी प्रशासनाला वेळोवेळी तक्रारी अर्ज केला होता.
मंडल अधिकारी, तलाठी यांच्याकडून पहाणी करण्यात आली मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. माझ्या घरापासून काही अंतरावर अनेक क्रशर आहेत, वारंवार जिलेटीन व अन्य स्फोटकांचा स्फोट होत असतो. तहसिलदारांनाही फोटोसह अर्ज दिला आहे. मात्र कारवाई होत नाही. माझे घर कोसळून जर काही बरे वाईट झाले तर त्याला पंढरपूर तहसिल कार्यालयच जबाबदार राहील. क्रशरवर व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी शेतकरी विजयानंद हक्के यांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.