...अन् मला घास गिळताना लाज वाटली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 10:55 AM2018-10-19T10:55:53+5:302018-10-19T10:56:19+5:30
टोमॅटो भरले तरी वजन काय होत नव्हतं. पुन्हा पुन्हा म्हातारं गुडघ्यावरच्या हाताच्या कोपऱ्याला जोर देऊन तराजू उचलायचा. काटा काय व्हायचा नाही.
-इंद्रजित घुले
भाजी घ्यायला गेल्यावर, टोमॅटोचे भाव विचारले. खेडेगावातनं टोमॅटोचं एक गाठोडं घेऊन आलेला साठीतला म्हातारा. कसे किलो म्हणताच, ते आजोबा म्हणाले,‘ दहा रुपयाला सव्वाकिलो.’ मेंदूनं लगेच गणित केलं. इथं किलोचा मामला नाही. डायरेक्ट सव्वाकिलो. कशासाठी? दहा रुपयाच्या खाली येता येत नाही. आलं सुट्ट्याचं वांदं. पाच रुपये किलोनं लावली तर अडीच रुपयाची अर्धा किलो मागितल्यावर आठ आठण्यासाठी वादावादी. सात रुपयानं लावली तरी तेच वांदं. माल विकला तर निदान दहा रुपयाची नोट तरी पाहता येईल. मग गिऱ्हाईकाला खूश करण्यासाठी दहा रुपयाची राऊंड फिगर पण त्यात सव्वाकिलो माल द्यायचा. कसं तरी ओझं विस्कटून देण्याऐवजी खपवून जायचा एवढाच साधा शेतकऱ्याचा उद्योगी विचार.
मी म्हटलं द्या दहा रुपयाची. मी मागताना आता किलोवर मागितलं नाही. दहा रुपयांची मागितली. वरचे पाव किलो सोडून काय आलंय? म्हाताºयानं काटा करायला तराजू हातात घेतला.
तराजूत एक किलोचं, दोनशे ग्रॅमचं आणि पन्नास ग्रॅमचं मापाचं वजन पारड्यात टाकलं. गुडघं मुडपून बसलेलं ते म्हातारं. तराजू धरलेल्या हाताचा कोपरा गुडघ्यावर टेकवून दुसऱ्या हातानं दुसऱ्या ताकडीत टोमॅटो टाकायला लागला. दहा रुपयात सव्वाकिलो येताहेत. त्यात निवडत कशाला बसायचं आणि निवडायला तेवढं वाकायचं कशाला म्हणून त्या म्हाताºया आजोबांनाच सांगितलं. टाका कसली टाकायची ती. म्हणून ते स्वत:च भरत होते.
टोमॅटो भरले तरी वजन काय होत नव्हतं. पुन्हा पुन्हा म्हातारं गुडघ्यावरच्या हाताच्या कोपऱ्याला जोर देऊन तराजू उचलायचा. काटा काय व्हायचा नाही. पुन्हा दोन-चार टोमॅटो पारड्यात टाकली. पुन्हा गुडघ्यावर पेलून तशीच कृती केली. वजन काही होत नव्हते. बारकं पारडं आणि सव्वाकिलोचं वजन. मेळच बसत नव्हता. वेळ का लागतोय म्हटल्यावर मी पाहिलं तर वजन होत नव्हतं. दोन टोमॅटो टाकून पुन्हा काटा वरच उचलताना म्हाताऱ्याच्या मनगटात जीव गोळा होत होता. मुळात अंगात जीव होता की नाही अशीच त्या आजोबांची अवस्था. त्याही अवस्थेत तो माणूस काहीतरी भागेल. पोटापाण्याची सोय होईल म्हणून इथंपर्यंत येऊन उन्हा तान्हात बसलेला. एवढं करून काही चालेल याचा भरवसा नाही. माल खपेल याची शक्यता नाही.
मी बाजारातून घराकडं निघालो आणि माझ्या नजरेतून आणि मनातून त्या आजोबांनी गुडघ्यावर टेकून वजन करतानाची कसरत विसरता येईना. दहाला सव्वाकिलो द्यायची म्हणजे द्यायची. दिल्या शब्दाला जागणारा असा शेतकरी असतो. पिकवताना रक्त आटवायचं. विकताना जीव मेटाकुटीला येतो. पदरात काय तर सव्वाकिलोला दहा रुपये.
मी विचार केला. आपल्याला काही वर्षांपूर्वी भास्कर चंदनशिव यांचा ‘लाल चिखल’ धडा होता. त्यातली टोमॅटोची कथा आठवली. आज दहा-पंधरा वर्षांनीही ती कथा जशीच्या तशी जिवंत आहे. बरं झालं अभ्यासक्रमात ती कथा होती. त्यामुळं आज मला शेतकºयाच्या घामाचं गणित करता आलं. ती कथा नसती तर काहीच कळलं नसतं. पूर्वी शेतकºयाचं कसं होत होतं आणि आज कसं होतंय ते. इतक्या वर्षानंतरही जग कुठल्या कुठे गेलं. माणसांना शौचालयाला कसं जायचं माहिती नव्हतं. ती माणसं आज पन्नास-सत्तर हजारांचे मोबाईल घेऊन फिरताहेत.
महात्मा फुले, वि.रा.शिंदे यांनी या फाटक्या तुटक्या माणसांचा विचार केला होता. त्यानंतर गेल्या दोनशे वर्षांत या मातीतल्या माणसांकडं ढुंकूनही पाहण्याची कुणाची तयारी नाही. आपण असं कसं करतो. दहा रुपयात त्याचं सर्वस्व विकत घेऊन येतो. ते चव देऊन खातो. जेव्हा त्या दिवशी ताटात जेवण वाढून आले आणि माझ्यासमोर वाटीत भाजी दिसली. तेव्हा पुन्हा त्या म्हाताऱ्याची आठवण आली. मला त्याची दहा रुपयानं सव्वाकिलो घ्या म्हणणारे कणवेचे डोळे दिसले. मी ताटात पाहिलं. ताटात भाजीवर तेल नव्हतंच. त्या शेतकºयाचं लाल रक्त तरंगताना दिसलं. अरे! आपण. क त्याच्या घामाच्या सुगंधावर आपलं आयुष्य फुलवतोय. घास गिळताना पुन्हा मला लाज वाटली.
(लेखक कवी, साहित्यिक आहेत)