सोलापुरात शुक्रवारपासून हर्र बोला हर्रचा जयघोष घुमणार, ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेस १२ जानेवारीपासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:30 PM2018-01-09T12:30:45+5:302018-01-09T12:33:48+5:30
महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचे दैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला १२ जानेवारीपासून प्रारंभ होत असल्याची माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर : महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचे दैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला १२ जानेवारीपासून प्रारंभ होत असल्याची माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिली.
शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या नंदीध्वजांची व श्री सिद्धेश्वराच्या पालखीची शुक्रवार १२ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू यांच्या मठातून मिरवणूक निघणार आहे. हि मिरवणूक सिद्धेश्वर मंदिरात आल्यानंतर ६८ लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी मार्गस्थ होणार आहे. शनिवार १३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर नंदीध्वजांचा अक्षता सोहळा पार पडणार आहे. रविवार १४ जानेवारी रोजी रात्री १० वाजता होमविधी सोहळा असून सोमवार १५ जानेवारी रोजी रात्री आठ वाजता होम मैदानावर शोभेचे दारूकाम होणार आहे. मंगळवार १६ जानेवारी रोजी मल्लिकार्जुन मंदिरात नंदीध्वजांच्या वस्त्रविसर्जनाने यात्रेतील धार्मिक कार्यक्रमांची सांगता होणार आहे.
---------------------
असे होतील यात्रेतील धार्मिक कार्यक्रम़़़़़़़
- १२ जानेवारी - तैलाभिषेक - यन्नीमज्जन
- १३ जानेवारी - संमती कट्ट्याला अक्षता - भोगी
- १४ जानेवारी - होमविधी सोहळा - मकर संक्रांत
- १५ जानेवारी - शोभेचे दारूकाम - किंक्रांत
- १६ जानेवारी - नंदीध्वजांचे वस्त्रविसर्जन - कप्पडकळी
-----------------
विद्युत रोषणाई -----------
श्री सिद्धेश्वर मंदिर , श्री मल्लिकार्जुन मंदिर, गुरुभेट, सोन्नलगी सिद्धेश्वर मंदिर व रेवणसिद्धेश्वर मंदिरासह ६८ लिंगाच्या ठिकाणीही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सिद्धेश्वर मंदिर परिसरात शक्तिशाली प्रकाशझोत व इलेकट्रीक होम्स लावण्यात आल्याने मंदिराचे देखणेपण आणखी खुलले आहे.
----------------
थेट प्रक्षेपण ----------------
अक्षता सोहळा, होमप्रदीपन व शोभेचे दारूकाम या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण सोलापुरातील सर्व वृत्त वाहिन्यांवरून केले जाणार आहे. त्याचप्रमाणे १३ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता सोलापूर आकाशवाणीवरून अक्षता सोहळ्याचे विशेष प्रसारण सुरु होईल. सिद्धरामेश्वराची वचने , सिद्धरामेश्वरविषयक गीते श्रोत्यांना ऐकविली जाणार आहेत. अक्षता सोहळा संपेपर्यंत याचे धावते वर्णन श्रोत्यांना ऐकायला मिळेल.
-------------------
रांगोळीच्या पायघड्या ---------
अक्षता सोहळ्याच्या दिवशी १३ जानेवारीला कसबा पेठेतील हिरेहब्बू मठापासून सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्टयापर्यंतच्या तीन किलोमीटरच्या मार्गावर संस्कार भारतीच्यावतीने रांगोळीच्या पायघड्या घालण्यात येणार आहेत. रघुराज देशपांडे व देवेंद्र अवाचित यांच्या मार्गदर्शनाखाली २०० कार्यकर्ते रंगावली रेखाटणार आहेत. १४ जानेवारीला मकरसंक्रांतीनिमित्त होमविधीसाठी निघणाºया नंदीध्वजाच्या मिरवणूक मार्गात कला फाउंडेशनच्या रुपाली कुताटे , शेट्टी व अन्य कार्यकर्त्यांकडून विजापूर वेशीपर्यंत रांगोळीच्या पायघड्या घालण्यात येणार आहेत.
------------------
महाप्रसाद -----------------
महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविक यात्रेसाठी येतात. या भाविकांना दासोहमध्ये महाप्रसादाची व्यवस्था करण्यात अली आहे. यामध्ये ज्वारी व बाजरीची कडक भाकरी. शिरा, गरगटा, भात , सार असा महाप्रसाद असतो. भाविकांशिवाय बंदोबस्तासाठी असलेले पोलिसही दासोहमध्ये महाप्रसादाचा लाभ घेतात .
----------------
जनावर बाजार -------
विजापूर रस्त्यावरील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरातील जागेमध्ये जनावर बाजार भरविण्यासाठी तयारी सुरु आहे. या बाजारात महाराष्ट्रासह आंध्र आणि कर्नाटकातील शेतकरी पशुधन खरेदी - विक्रीसाठी येतात.
---------------
कृषी प्रदर्शन -------------
होम मैदानावर १२ ते १६ जानेवारी या कालावधीत श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरणार असून त्यामध्ये बी -बियाणे , खते , कीटकनाशके, अवजारे, सिंचन क्षेत्रातील सर्व प्रकारचे उद्योग व संशोधनाशी संबंधित विविध स्टॉलचा समावेश आहे. यात्रा समिती आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन विभागाच्यावतीने हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. शेतक-यांसाठी या प्रदर्शनात तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन होण्यासाठी परिसंवाद होणार आहे.
--------------
सीसीटीव्ही कॅमेरे -------
भाविकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने मंदिरात २४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून अक्षता सोहळा व होम मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. मिरवणूक मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असतील.
--------------
करमणुकीची साधने -----
या यात्रेसाठी होम मैदानावर विविध स्टॉलस, दुकाने आणि करमणुकीची साधने आहेत. त्यामध्ये गृहोपयोगी वस्तू, हस्तकला, चित्रकला, विणकाम, खाद्यपेयांची दुकाने, फोटो स्टुडिओ , ज्वेलर्स, खेळण्यांची दुकाने आहेत. आकाश पाळणे, मौत का कुआ , लोखंडी ब्रेकडान्स , गाढवाची कसरत, क्राँस व्हील , मॅजिक शो, सेल बो, मिनी रेल , कटर पिलर, , हंसी घर, डॉग शो, मेंढक, एअर इंडिया, कोलंबस, नागकन्या, आदी करमणुकीची आकर्षणे आहेत.डिस्ने लँड यंदाच्या वषार्चे आकर्षण असणार आहे.