दोन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न वारांगणेनेच पाडला हाणून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:39 PM2019-06-03T13:39:11+5:302019-06-03T13:40:20+5:30
दलाल तरुणाला चांगला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आणि कायमस्वरुपी नरकात येणाºया मुलींना थांबवून तिच्या आईच्या स्वाधीन केले.
संताजी शिंदे
सोलापूर : गावाकडून येऊन भीक मागणाºया अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसाय करण्याच्या ठिकाणी आणून विक्री करण्याचा प्रयत्न होत असताना दस्तुरखुद्द एका वारांगणेने त्यांचे संरक्षण केले. दलाल तरुणाला चांगला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आणि कायमस्वरुपी नरकात येणाºया मुलींना थांबवून तिच्या आईच्या स्वाधीन केले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील एका गावातील एक १२ वर्षांची आणि एक ७ वर्षांची अशा दोन मुली आहेत. वडील नसल्याने त्यांचा सांभाळ एकटी आई करते, ती आजारी असल्याने काम होत नाही. स्वत:बरोबर आईचे पोट भरण्यासाठी दोन चिमुरड्या दररोज बसने सोलापुरात येतात. शहरातील नवीपेठ, सिग्नलच्या ठिकाणी फिरून या मुली भीक मागतात. मिळालेले पैसे घेऊन त्या पुन्हा सायंकाळी बसने गावी जातात. ऊन, वारा, पाऊस या कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता या दोन मुली दररोज सोलापुरात येत असतात.
दररोजचा दोन मुलींचा हा प्रकार पाहून एकेदिवशी त्याने त्यांचा पाठलाग केला. मुली नेहमीप्रमाणे बसमध्ये बसून सोलापुरात आल्या, त्या नवीपेठ या भागात भीक मागत फिरत होत्या. गावातील त्या मुलाने दोघींना गाठले, इकडे कुठे फिरत आहात या ठिकाणी जास्त पैसे मिळत नाहीत. चला तुम्हाला जास्त पैसे मिळण्याच्या ठिकाणी घेऊन जातो असे सांगून तो चालवत दोघींना बुधवार पेठ येथील तरटी नाक्याजवळ आणले.
दोन्ही मुलींना रस्त्याच्या पलीकडील बाजूस थांबवून तो एकटा तरटी नाक्यावरील वारांगणेकडे गेला. तेथील वारांगणेला त्याने माझ्याकडे दोन मुली आहेत, त्यांना विकायचे आहे. मला वीस हजार रुपये द्या अशी मागणी तरुणाने केली. तरटी नाका येथील वारांगणेला तरुणाचा संशय आला, तिने त्याला विश्वासात घेतले. मुली कोठे आहेत? त्यांना घेऊन ये पाहिल्याशिवाय पैसे देता येणार नाही असे सांगितले. दलाल एवढ्यावरच न थांबता एक अट घात्0'ाली म्हणाला की मी मुलींना देतो तुम्ही मला पैसे द्या. वारांगणेने ही अट मान्य केली. दलाल तरुण तेथून गेला, रस्त्याच्या पलीकडे एका बोळात उभ्या केलेल्या दोन अल्पवयीन मुलींना घेऊन पुन्हा तरटी नाक्याकडे आला.
वारांगणेने दोन्ही मुलींना पहिल्यांदा ताब्यात घेतले आणि तरुणाला धरून सर्वांनी मिळून चांगला चोप दिला. त्याला धरून पोलीस चौकीत नेले, तेथील अधिकाºयांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आपला हिसका दाखवताच तो पोपटाप्रमाणे बोलू लागला, चूक झाली माफ करा अशी विनंती करू लागला. मुलींच्या आईला गावात संपर्क साधून बोलावण्यात आले. आईने तो तरुण त्यांच्याच गावातील असल्याचे सांगितले.
‘आमच्यासारखं दुर्दैव दुसºयांच्या नशिबी येऊ नये’
- लहानपणी भविष्याचे चांगले स्वप्न पाहत असताना तारुण्यात माझा घात झाला. नाईलाजाने मला वारांगणा व्हावं लागलं. आज माझ्याकडे पर्याय नाही. जगण्यासाठी देहविक्री करते, लोक म्हणतात आकाशात स्वर्ग आणि नरक आहे. मी स्वत: जिवंतपणी पृथ्वीवर नरकाची शिक्षा भोगत आहे. मी मेल्यावर स्वर्गात जाईन किंवा नरकात जाईन मात्र या पृथ्वीवरच्या नरकातून मात्र माझी सुटका होईल. निष्पाप, भोळ्या भाबड्या मुली या क्षेत्रात फसवून आणल्या जातात. आमच्यासारखं दुर्दैव त्यांच्या नशीबी येऊ नये असं मनापासून वाटतं साहेब अशी भावना तरटी नाक्याच्या वारांगणेने व्यक्त करीत स्वत:च्या डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली.