हातभट्टीवाले रमले आता चहा टपरी, किराणा, शेळीपालन अन् शेती व्यवसायात
By Appasaheb.patil | Published: September 18, 2021 10:56 AM2021-09-18T10:56:37+5:302021-09-18T10:56:45+5:30
ऑपरेशन परिवर्तन होतेय सक्सेस: व्यवसायाकडे वळण्यासाठी पोलिसांकडून तरुणांचे समुपदेशन
आप्पासाहेब पाटील
सोलापूर - सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या ऑपरेशन परिवर्तन मोहिमेला यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. दररोज हातभट्टीच्या धुरात काम करणारे हात आता चहा टपरी, किराणा दुकान, शेळीपालन अन् शेती व्यवसायात गुुंतल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून ७१ गावांमध्ये ऑपरेशन परिवर्तन हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. अवैधरित्या हातभट्टी चालवणाऱ्यांवर कारवाई करुन तो पूर्णपणे बंद करून हातभट्टी चालवणाऱ्या व्यावसायिकांचं आणि तरुणांचं समुपदेशन करुन त्यांना व्यवसाय, उद्योग व नोकरीसाठी समुपदेशन, मदत करण्याचा प्रयत्न ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.
--------
असे झाले गुन्हे दाखल...
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून हातभट्टीची दारू गाळण्याबाबत मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात येतात. दारुभट्टी उद्ध्वस्त केली जाते.
- जुलै २०१९ पर्यंत १४९८ गुन्हे
- जुलै २०२० पर्यंत १७२२ गुन्हे
- जुलै २०२१ पर्यंत २४५९ गुन्हे
आतापर्यंतच्या कारवाईवर एक नजर...
- ११० - केसेस
- १८ हजार ४९० लिटर हातभट्टी दारू जप्त
- ९३ हजार ८४५ लिटर गूळमिश्रित रसायन नष्ट
- ५८ क्वार्टर बाटल्या जप्त
- २३ लाख ६५ हजार ५१७ रुपये किमतीचा माल नष्ट
---------
८० टक्के हातभट्ट्या उद्ध्वस्त
सोलापूर जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती करणाऱ्या ८० टक्के हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, त्यातील सांगोला येथील एक हातभट्टी चालकाने घोड्याचा व्यवसाय सुरू केला आहे. सांगोला येथील महिलेने शेळीपालन, मोहोळ हद्दीतील एकाने किराणा तर मुळेगाव भागातील काहींनी शेती व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. मुळेगाव, घोडातांडा, बक्षीहिप्परगा, भानुदास तांडा या तांड्यावरील शेकडो हातभट्टी चालक शेती व्यवसायात रमले आहेत.
जिल्ह्यात सर्वच अवैध हातभट्टीवर कारवाई सुरू आहे. दररोज आमचे पोलीस अधिकारी, कर्मचारी प्रत्येक हातभट्टी परिसरात भेट देऊन हातभट्टी चालक व त्यांच्या कुटुंबीयांना अन्य व्यवसायाकडे परावृत्त करण्यासाठी समुपदेशन व शक्य तेवढी मदत करीत आहेत. ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत आणखीन खूप काही करणे बाकी आहे. हळूहळू तो आम्ही ते करतोय. हातभट्टी चालक व्यावसायिक, उद्याेजक, प्रगतिशील शेतकरी व चांगल्या ठिकाणी जॉब करतील असा विश्वास आहे.
- तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण.