हातमागाला जीएसटीतून वगळले; सोलापुरातील दीड हजार कारागिरांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:18 PM2018-08-13T12:18:03+5:302018-08-13T12:22:56+5:30
सोलापूर : केंद्र सरकारने रविवारी हातमाग आणि हस्तकलेला जीएसटीतून वगळल्याने सोलापुरातील दीड हजार कारागिरांना लाभ होणार असून वॉलहँगिंगसारख्या आंतरराष्टÑीय पातळीवर पोहोचलेल्या कलेलादेखील प्रोत्साहन मिळणार आहे.
३० वर्षांपूर्वी हातमाग कलेची जगभरात ओळख असणाºया सोलापुरात पॉवरलुम आल्यानंतर हातावर वस्त्र विणण्याचा प्रकार कमी झाला. मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक ज्यांना परवडत नाही. असे १५०० कुटुंब हातमागाचा व्यवसाय करतात. रेशीमपासून बनविण्यात येणाºया हलक्या साड्या माधवनगर, विष्णुनगर या ठिकाणी बनविल्या जातात.
पैठणीसाडी प्रमाणे दीड ते दोन लाख रुपये किमतीची साडीही सोलापुरातील हातमागावर बनविण्यात येते. त्याचबरोबर हलके टॉवेलही बनतात. यासाठी लागणाºया कापडावर ५% जीएसटी आकारण्यात येत होता. हा कर शासनाने हातमागदिनाचे औचित्य साधून रद्द केला आहे. सातासमुद्रापार पोहोचणारी वॉलहँगिंगची कलाही सोलापूरचीच आहे. आठ ते १० ठिकाणी सोलापुरात हे काम होते. त्यावरील जीएसटीही रद्द करण्यात आल्यामुळे या सुबक कलेला वाव मिळणार आहे.