सुखी जीवन हवंय ?; मग विचार बदला : प्रल्हाद पै, जीवन विद्या मिशनतर्फे प्रेरणादायी प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:57 PM2017-11-28T12:57:18+5:302017-11-28T13:00:49+5:30
तुम्हाला जर जीवन सुखी आणि समृध्द करायचे असेल तर विचार बदला...जीवनाला आकार देण्यासाठी मनाला वश करा, असे प्रेरणादायी प्रबोधन आज जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद पै यांनी येथे केले. जीवन विद्या मिशनच्या जीवन व्यवस्थापन मालिकेतील २२ वा कार्यक्रम सायंकाळी येथील हुतात्मा स्मृती मंदिरात झाला.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २८ : तुम्हाला जर जीवन सुखी आणि समृध्द करायचे असेल तर विचार बदला...जीवनाला आकार देण्यासाठी मनाला वश करा, असे प्रेरणादायी प्रबोधन आज जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद पै यांनी येथे केले. जीवन विद्या मिशनच्या जीवन व्यवस्थापन मालिकेतील २२ वा कार्यक्रम सायंकाळी येथील हुतात्मा स्मृती मंदिरात झाला.
प्रल्हाद पै हे सद्गुरू वामनराव पै यांचे सुपुत्र आहेत. उच्चविद्याविभूषित असलेल्या प्रल्हादजींकडे जीवन विद्या मिशनचे नेतृत्व आहे. त्यांना ऐकण्यासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती; पण अतिशय शिस्तबध्द व्यवस्थेमुळे सर्वांना हा कार्यक्रम व्यवस्थितपणे ऐकता आला. ‘विचार देई जीवना आकार’ हा पै यांच्या मार्गदर्शनाचा विषय होता.
मन म्हणजे काय? मनाचे प्रकार, त्याचे महत्त्व, विचार आणि त्यामुळे जीवनात येणारे सकारात्मक परिवर्तन, याबाबत प्रल्हाद यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मन हे आपल्या हातात आले पाहिजे. आपण मनाच्या खूपच आहारी गेलो आहोत. त्याच्यावर नियंत्रण मिळविले पाहिजे. एक मन हातात आले म्हणजे आपला प्रपंच सुखाचा आणि उत्कर्षाचा होईल.
बहिर्मन आणि अंतर्मन हे मनाचे दोन प्रकार आहेत. हे दोन्हीही मनं जीवनात गोंधळ घालत असतात. त्यांना शिस्त लावली पाहिजे. आपण दिवसभरात ६० हजार विचारांना जन्म देत असतो. हे सारे विचार बहिर्मनात चाललेले असतात. अंतर्मन आपोआप विचार करते आणि बहिर्मनाच्या विचारांना तथास्तू म्हणते. एखादी गोष्ट आपणाला साकारायची असल्यास त्या गोष्टीचा बहिर्मनात आलेला विचार अंतर्मनाला पटला पाहिजे. दोन्ही मनांचे एकमत झाल्यावर ती गोष्ट साकार होते. यावरून आपल्या जीवनात जे जे घडते ते ते सारे विचारातूनच आकार घेते, हे स्पष्ट होते. त्यामुळे आपण प्रत्येकानेच आपल्या विचारांकडे लक्ष द्यायला शिकले पाहिजे, असे ते म्हणाले.
माणसाचे अंतर्मन आणि बहिर्मन नेहमीच आत्मशक्तीच्या रूपात असते, असे सांगून पै यांनी अंतर्मनाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, या मनावरील श्रध्दा वाढविल्यास तुम्हाला जीवनात जे जे साकार करायचे ते सारे मिळेल; पण यासाठी आपल्या क्षमतेनुसार मागा. आशावादी राहा. जे साकार करायचे आहे, त्याच्या विचारांची उजळणी करत चला आणि साकार झाल्यानंतर ते यश साजरे करा.
जीवनात सारे काही विचारांमुळेच घडत असल्यामुळे प्रत्येकानेच चांगला आणि सहकारात्मक विचार केला पाहिजे. विचार पाहत असताना एखादा वाईट विचार आला तर त्याला थांबवून सकारात्मक विचार केला पाहिजे. अंतर्मनालाही नेहमीच सकारात्मक संदेश द्यायला हवेत. विचारांना कल्पना आणि भावनांचे खतपाणी घातले पाहिजे, असेही ते म्हणाले.
------------------
उत्तम विचारांचे फायदे
उत्तम विचारांचा नेहमी तन, मन,धन, वन आणि जनांवर सकारात्मक परिणाम होतो. चांगल्या विचारांमुळे आपले आरोग्य चांगले राहील याशिवाय मन सुदृढ होईल. तुमचे उत्पन्न वाढून श्रीमंती येईल. चांगल्या विचारांमुळे विचारांचे प्रदूषण दूर होईल आणि विश्वशांती नांदेल, असे प्रल्हाद पै यांनी सांगितले.