चंद्रकांतदादांच्या तोंडून 'पदवीधर' हा शब्द कधी ऐकला होता का ? ; शरद लाड यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 09:17 AM2020-11-11T09:17:15+5:302020-11-11T09:17:21+5:30
राष्ट्रवादीच जिंकणार पुणे पदवीधर मतदारसंघ; शरद लाड यांचा दावा...
सोलापूर : पुणे पदवीधर मतदारसंघातून दोनदा निवडून येऊनही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर हा शब्द एकदाही उच्चारल्याचे ऐकले नाही. इतर कुणीतरी ऐकले होते का? त्यांनी पदवीधर तरुणांसाठी काही कामच केले नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद लाड यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी मंगळवारी राष्ट्रवादी भवनात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यानंतर ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, प्रदेश सचिव प्रशांत बाबर, अरुण आसबे, श्रीकांत शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
लाड म्हणाले, भाजप यापूर्वी संघटनेतील लोकांना उमेदवारी द्यायचे. आता त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या संग्राम पाटलांना उमेदवारी दिली. यातच त्यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यात पुणे विभागातील अनेक बँका, कारखाने, संस्था आहेत. मात्र हा मतदारसंघ आपल्या ताब्यात नाही ही सल नेतृत्वाच्या मनात आहे. या निवडणुकीत चित्र बदलेले दिसेल. युवकचे पदाधिकारी नेमताना तालुक्यातील नेत्यांना विचारात घेतानाच निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न राहील. युवकचे यापूर्वीचे जिल्हाध्यक्ष विक्रांत माने यांचेही काम चांगले होते. मुदत संपल्यामुळे नवा अध्यक्ष नेमण्यात आला.
आमच्यामुळेच सारंग पाटील पडले...
पदवीधरच्या मागील निवडणुकीत आमच्या बंडखोरीमुळेच राष्ट्रवादीचे सारंग पाटील पडले. नेतृत्वाने आमची नाराजी वेळेवर दूर केली नव्हती. पण यावेळेस पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रचार करु. युवकचे पदाधिाकरी म्हणून उमेश पाटलांनाही चांगली संधी मिळावी ही भावना आहे. पण नेतृत्वाचा निर्णय महत्त्वाचा आहे. राष्ट्रवादीकडून अरुण लाड यांना उमेदवारी मिळेल, असा विश्वासही शरद लाड यांनी व्यक्त केला.