ठार करण्यासाठीच त्याने स्वीकारले ड्रायव्हरचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:20 AM2021-04-05T04:20:06+5:302021-04-05T04:20:06+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोडनिंबवरून मोहोळकडे येणाऱ्या दुचाकीला देवडीच्या हद्दीत पाठीमागून आलेल्या टँकरने एम. एच. १२, आर. एन. ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोडनिंबवरून मोहोळकडे येणाऱ्या दुचाकीला देवडीच्या हद्दीत पाठीमागून आलेल्या टँकरने एम. एच. १२, आर. एन. १६९१ जोराची धडक दिली. त्यात दुचाकीवरील बसवेश्वर वाघचवरे याच्या अंगावरून टँकरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले मारुती करंडे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर टँकर चालक पळून गेला. याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
या प्रकरणाचा तपास करताना तपासी अधिकारी धनाजी खापरे यांनी चालकाची माहिती घेतली असता दादासाहेब दिलीप करंडे रा सारोळे गावचा असल्याने संशय बळावला. त्यानंतर खापरे यांनी संशयिताचे मोबाईल कॉल चेक केले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. दीड वर्षापूर्वी एका चारा छावणीत
रेखा वाघचवरे व दादासाहेब कारंडे यांची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दरम्यान ४ महिन्यापूर्वी या दोघांच्या कॉलचे बोलणे रेखाचा पती बसवेश्वर याच्या निदर्शनास आले. तेव्हापासून हे पती-पत्नी व दादासाहेब कारंडे यांच्यात वाद सुरू झाले. या वादामुळे आपल्या प्रेमात आड येणाऱ्या पतीचाच काटा काढायचा असा विचार रेखा आणि दादासाहेबाने केला. यासाठी दादासाहेब काही दिवसापूर्वी पुणे येथील ट्रान्सपोर्टमध्ये टँकरवर चालक म्हणून कामाला गेला. तो मोहोळकडे जाणारी ड्यूटी कधी मिळतेय याची वाट पाहत होता.
दरम्यान २१ मार्च रोजी त्याला कर्नाटकात सेडम येथे टँकर सोडण्याची ड्यूटी मिळाली. याच संधीचा फायदा घेत दादासाहेबाने आपला कट यशस्वी करण्यासाठी २२ मार्च रोजी टँकर घेऊन सोलापूरच्या दिशेने येतानाच बसवेश्वर हा कुठे कामाला आहे. हे पाहत असताना मोडनिंबजवळ जेसीबीवर काम करताना तो दिसला. त्यानंतर तो गावाकडे जाण्याची वाट पाहत तेथेच थांबला. दरम्यान सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बसवेश्वरची दुचाकी दिसली. मात्र त्यावर दोघे होते. द्वेषाने पेटलेल्या दादासाहेबाने कसलाही विचार न करता त्याच्या पाठीमागे टँकर लावला. निर्जन जागा पाहून त्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात
मागे बसलेले मारुती करंडे उडून बाजूला पडले तर बसवेश्वरच्या अंगावरुन चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. त्यानंतर आपला कट यशस्वी झाला असा फोन प्रेयसी रेखाला करुन आता थोडे दिवस दोघांचेही मोबाईल बंद ठेव असे सांगून दादासाहेबाने मित्राच्या मदतीने धूम ठोकली.
दुचाकी टँकरखाली अडकली अन् पोलिसांचा शोध यशस्वी
परंतु हे कृत्य नियतीला न पटल्यानेच घोटाळा झाला. बसवेश्वरची दुचाकी त्या टँकरखाली अडकली ती निघालीच नाही. अन्यथा दादासाहेब तो टँकर घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला असता. पोलिसांनी त्या टँकरच्या चालकाचा पत्ता शोधला असता तो गावातीलच निघाला. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक खापरे यांनी अधिक चौकशीसाठी सर्व संशयितांचे मोबाईल कॉल चेक केले. तेव्हा रेखा वाघचवरे व दादासाहेब करंडे यांनी आपल्या प्रेमसंबंधात आड येणाऱ्या बसवेश्वरचा खून केल्याचे निष्पन्न झाले.
दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी खापरे करीत आहेत.