कोरोनाशी लढण्यासाठी केगांव पोलीस केंद्राचाही घेतला ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:07 AM2020-03-13T11:07:14+5:302020-03-13T12:17:04+5:30
सोलापुरात दोनशे बेडची व्यवस्था; संशयित रुग्ण आढळल्यास उपचारासाठी प्रशासन सज्ज, शाळांमध्ये जागरुकता वाढली
सोलापूर : कोरोना संशयित रुग्णाबाबत परिस्थिती आढळली तर जिल्हा प्रशासन सज्ज असून, जिल्ह्यात २२ रुग्णालयात ६५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील वसतिगृहाचा ताबा घेण्यात आला आहे. या ठिकाणी संशयित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना निगराणीखाली ठेवण्यासाठी २०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
कोरोना आजाराबाबत जागरूक राहण्याबाबत शासनातर्फे कळविण्यात आले आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाºयांशी संवाद साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात अद्याप एकही संशयित आढळलेला नाही. पण तरीही भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शहर व जिल्ह्यात २२ रुग्णालयात संशयित रुग्णांवर उपचार करण्याची सोय करण्यात आली आहे. यामध्ये शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे.
सोलापूरबरोबरच पंढरपूर, अकलूज, बार्शी अशा ठिकाणच्या प्रत्येक रुग्णालयात पाच बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. संशयित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना निगराणीखाली ठेवण्यासाठी वाडिया व केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात सोय करण्यात आली आहे. राखीव ठेवण्यात आलेल्या रुग्णालयात पुरेसा औषधसाठा करण्यात आला असून, व्हायरल रुग्णावर जे उपचार केले जातात त्याची सोय करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, महापालिका आयुक्त दीपक तावरे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार उपस्थित होते.
नागरिकांमध्ये जनजागृती
शासनाकडून जनजागृतीबाबत गुरुवारी साहित्य पाठविण्यात आले आहे. शुक्रवारपासून सार्वजनिक ठिकाणी याची प्रसिद्धी केली जाईल. याच पार्श्वभूमीवर हॉटेल, मॉल, सिनेमागृह, टुरिस्ट चालकांची बैठक घेण्यात आली. कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. शासकीय सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आठवडा बाजार सुरूच राहतील, मात्र गर्दीचे कार्यक्रम शक्यतो टाळावेत, असे आवाहन शंभरकर यांनी केले.