वेशांतर करून गुंगारा देत राहिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:27 AM2021-09-12T04:27:07+5:302021-09-12T04:27:07+5:30
खबऱ्यामुळे पोलिसांच्या हाती लागला लोकमत न्यूज नेटवर्क बार्शी / कुसळंब : टॉवेलमध्ये दगड घालून तो डोक्यावर मारून एका व्यक्तीचा ...
खबऱ्यामुळे पोलिसांच्या हाती लागला
लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शी / कुसळंब : टॉवेलमध्ये दगड घालून तो डोक्यावर मारून एका व्यक्तीचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पेटवून दिला. त्यानंतर आरोपी पोलिसांना गुंगारा देत राहिला. मात्र, खबऱ्याने माहिती दिली अन् पाच वर्षांनंतर आरोपी बार्शी तालुका पोलिसांच्या हाती लागला.
वसंत बाबू मांजरे (रा. देवगाव, मा. ता. बार्शी) असे पाच वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, आरोपी वसंत बाबू मांजरे याने २ ऑक्टोबर २०१७ रोजी देवगाव (मा) येथे भालेराव वस्तीजवळ धर्मराज विठ्ठल मांजरे यास टॉवेलमध्ये दगड बांधून डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. उपचारादरम्यान धर्मराज विठ्ठल मांजरे यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वसंत बाबू मांजरे हा पुणे, आळंदी, जेजुरी, सातारा या शहरांमध्ये वेशांतर करून पोलिसांना गुंगारा देत राहिला आणि पांगरी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तो पोलिसांना गुंगारा देत राहिला.
---
आरोपी पांगरी पोलिसांच्या हवाली
अखेर ११ सप्टेंबर रोजी सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांना वसंत मांजरे हा लोणंद (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे वावरत असल्याची खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे एक पथक शोधार्थ दाखल झाले. लोणंद गावच्या शेजारी पाडळी गावाच्या शिवारात महादेव नगर येथे पथकाने वसंत मांजरे याला ताब्यात घेतले. या कारवाईत पोलीस नाईक अमोल माने, अभय उंदरे, धनराज फत्तेपुरे, रतन जाधव यांनी सहभाग नोंदविला. पुढील कार्यवाहीसाठी आरोपीस पांगरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
----
फोटो : ११ पांगरी पोलीस
पाच वर्षांपासून पाेलिसांना गुंगारा देत राहिलेला खुनातील आरोपी गजाआड करण्यात आला.