मुलीला भेटायला गेलेल्या आईचा खून करून मृतदेह विहिरीत टाकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:50 AM2021-02-05T06:50:07+5:302021-02-05T06:50:07+5:30
याबाबत मयत लक्ष्मी पवार यांची बहीण ताई अशोक काळे हिने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा ...
याबाबत मयत लक्ष्मी पवार यांची बहीण ताई अशोक काळे हिने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत लक्ष्मी पवार यांच्या कोमल नावाच्या मुलीचे लग्न माढा तालुक्यातील दगड अकोले येथील सोमनाथ अगतराव काळे यांच्याशी झाले होते. दोन वर्षांपूर्वी सोमनाथ याचा एका अपघातात मृत्यू झाला होता. कोमलची सासू विमल काळे, सासरा आगतराव काळे, नणंद प्रीती व कीर्ती हे सर्वजण कोमलला शारीरिक व मानसिक त्रास देत होते. कोमलला आईला भेटू देत नव्हते.
शनिवारी ३० जानेवारी रोजी लक्ष्मी पवार, बहीण ताई काळे, चुलत भाऊ अतुल शंकर काळे, जावई करण भोसले, मेहुणा माणिक भोसले हे सर्वजण तरंगवाडी येथून दगड अकोले येथे हे कोमलला भेटण्यास गेले होते; परंतु कोमलची नणंद प्रीतीने फोनवरून लक्ष्मी पवारला सांगितले की ‘तू एकटी भेटायला ये’ तेव्हा लक्ष्मी एकटी निघाली असता बहीण ताईने सांगितले की, लक्ष्मी तुझा फोन चालू ठेव, मीपण माझा फोन चालू ठेवते. शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास हे सर्व घडत असताना लक्ष्मी कोमलच्या घरी गेली तेव्हा लक्ष्मीच्या फोनवरून ताईला आवाज आला की, ‘आई ग मेले’ यानंतर ताईने वारंवार फोन करून लक्ष्मीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु लक्ष्मीचा फोन बंद लागत होता.
यानंतर सर्वजण परत तरंगवाडीला गेले व रविवारी सकाळी टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये आले. शनिवारी घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी दगड अकोले येथे जाऊन तपास केला असता कोमलची नणंद प्रीतीने घडल्या प्रकाराची माहिती देताच टेंभुर्णी पोलिसांनी प्रीती काळे, कीर्ती काळे व प्रीती काळेचा मित्र रॉकी या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे करीत आहेत.
-----
नणंद म्हणाली... खून करून विहिरीत टाकून दिले
पोलीस त्यांना घेऊन दगड अकोले येथे गेले. पोलिसी खाक्या दाखवून शनिवारी घडलेल्या प्रकाराबद्दल प्रीती काळे हिच्याकडे चौकशी केली. तेव्हा प्रीतीने सांगितले की, लक्ष्मी पवार ही मुलगी कोमलचा दुसरा विवाह करून देणार होती. लक्ष्मीने माझा भाऊ सोमनाथवर करणी केली होती, म्हणून मी, माझी बहीण कीर्ती व माझा मित्र रॉकी आम्ही तिघांनी लक्ष्मीचा खून करून तिच्या अंगाला दगड बांधून कॅनॉलजवळील विहिरीत टाकून दिले आहे. पोलीस प्रीतीला घेऊन विहिरीवर गेले. दोन पोहणाऱ्या व्यक्तींना विहिरीतून प्रेत सापडते का ते पाहण्यास सांगितले. त्या दोन व्यक्तींनी काही वेळातच लक्ष्मीचे प्रेत बाहेर काढले तेव्हा लक्ष्मीच्या गळ्यावर व हातापायावर वार केल्याचे दिसून आले.