म्हणे, इतरत्र फेऱ्या वाढल्याने कारीची बससेवा बंद केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:25 AM2021-09-24T04:25:46+5:302021-09-24T04:25:46+5:30
कारी, ता. उस्मानाबाद गाव पूर्वी बार्शी तालुक्यात होते. गेल्या अनेक वर्षांपासून भुसार व घाऊक बाजारपेठेसाठी कारी गावाची नाळ बार्शी ...
कारी, ता. उस्मानाबाद गाव पूर्वी बार्शी तालुक्यात होते. गेल्या अनेक वर्षांपासून भुसार व घाऊक बाजारपेठेसाठी कारी गावाची नाळ बार्शी शहराशी जुळलेली आहे. शिक्षणासाठी कारीतील शेकडो विद्यार्थी पांगरी मार्गे बार्शीला ये-जा करतात. गावातून बरेच जण नोकरीसाठी बार्शीला जातात. उपचारासाठी रुग्णांना बार्शीलाच घेऊन जातात. असे असताना मागील काही दिवसांपूर्वी बार्शी एसटी आगाराकडून कारीला जाणाऱ्या सकाळची व मुक्कामी बस व सर्व फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे गावच्या आर्थिक व शैक्षणिक विकासाला खीळ बसली आहे. ही मुक्कामी बस गेल्या ३३ वर्षांपासून म्हणजे १९८८ ला सोलापूर आगारातून सुरू केली होती. मुक्कामी बसने सकाळीच विद्यार्थी व नोकरीला जाणारे लोक जात होते. आता ही बससेवा बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे मुक्कामी बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
..............
गणेश उत्सवामुळे इतरत्र काही फेऱ्या वाढल्याने व काही तांत्रिक अडचणीमुळे कारीची सेवा थोड्या दिवसांसाठी बंद केली होती. परंतु, लवकरच ती पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. ती कायमस्वरूपी चालू ठेवणार आहेत.
-एम. के. वाकळे, आगार व्यवस्थापक, बार्शी