चार वार झेलले पण कामगारांच्या कष्टाचे पैसे सोडले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 04:38 PM2019-10-10T16:38:56+5:302019-10-10T16:41:33+5:30

मुनिमाचा प्रामाणिकपणा;  जीवाची पर्वा न करता पार पाडले कर्तव्य

He suffered four blows but left no labor wages | चार वार झेलले पण कामगारांच्या कष्टाचे पैसे सोडले नाहीत

चार वार झेलले पण कामगारांच्या कष्टाचे पैसे सोडले नाहीत

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या दहा वर्षांपासून ते मुनीम म्हणून काम करतात७ आॅक्टोबर २0१९ रोजी सकाळी ११ वाजता भूमेश गाजूल हे नेहमीप्रमाणे कामाला गेले मुनीम भूमेश गाजूल हे दुपारी १ वाजता अशोक चौकाजवळील एस.बी.आय बँकेत गेले

संताजी शिंदे 

सोलापूर : विजयादशमी होती... कामगार पगाराची आतुरतेने वाट पहात होते... मुनीम पैसे घेण्यासाठी बँकेत गेले... पैसे घेतले अन् नेहमीप्रमाणे पायी जात असताना  अचानक चोरट्याने मुनीमवर चाकूने हल्ला केला. हातातली बॅग हिसकावून घेत असताना त्यांनी चोरट्याचा विरोध केला. अंगावर वार घेतले; मात्र कामगारांचे पैसे सोडले नाहीत. जीवाची पर्वा न करता कारखान्याच्या मुनीमने आपले कर्तव्य पार पाडले. 

भूमेश मल्लेशम गाजूल (वय ४६, रा. नवीन गोदूताई विडी घरकूल, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) हे श्रीनिवास कमटम चादर, टॉवेल कारखान्यात कामाला आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते मुनीम म्हणून काम करतात. ७ आॅक्टोबर २0१९ रोजी सकाळी ११ वाजता भूमेश गाजूल हे नेहमीप्रमाणे कामाला गेले. कारखान्यात दर मंगळवारी कामगारांना पगार दिला जातो; मात्र त्या दिवशी विजयादशमी असल्याने मालक श्रीनिवास कमटम यांनी एक दिवस अगोदर बँकेतून एक लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. मुनीम भूमेश गाजूल हे दुपारी १ वाजता अशोक चौकाजवळील एस.बी.आय बँकेत गेले. पैसे घेऊन ते १.४५ वाजता बँकेतून बाहेर पडले. बँकेच्या पाठीमागील बाजूलाच काही अंतरावर कारखाना असल्याने ते पैशाची पिशवी गळ्यात घालून पायी चालत जात होते. 

बँकेपासून थोड्या अंतरावर उजव्या बाजूला असलेल्या बोळातून ते जात असताना अचानक संतोष दत्तात्रय साखरे हा चोर पाठीमागून आला. त्याने थेट पैशाची बॅग असलेल्या हातावर चाकूने वार केला. बॅग सोडत नसल्याचे पाहून चोरट्याने त्यांच्या हातावर आणखी दोन वार केले. तरीही बॅग सुटत नसल्याचे पाहून त्याने छातीवर व पोटावर वार केला. भूमेश हे गंभीर जखमी झाले, अंगातून रक्त मोठ्या प्रमाणात वाहत होते. काही केल्या बॅग चोरट्याच्या हातात जाऊ नये म्हणून भूमेश यांनी ती जवळ असलेल्या एका दुकानासमोर फेकली. दुकानातील मालक पळत बाहेर आले, त्यांनी बॅग हातात घेतली; मात्र चोरटा त्यांच्या अंगावर धावून गेला. चाकूचा धाक दाखवत त्याने बॅग घेतली आणि तेथून पळ काढला; मात्र पलीकडच्या बोळात काही लोकांनी त्याचा पाठलाग करून पकडले.  

वाचवण्यासाठी ओरड केली; मात्र पाहणारेही घाबरले होते..
- एक चोरटा पैशाची बॅग घेण्यासाठी मुनीम भूमेश यांच्यावर चाकूने हल्ला करीत होता, ते जीव वाचवण्यासाठी लोकांना ओरडत होते; मात्र त्याच्याकडे असलेला चाकू पाहून जवळ येण्याचे धाडस करीत नव्हते. गंभीर जखमी अवस्थेत भूमेश गाजूल पोलीस चौकीत गेले. पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथून मालक श्रीनिवास कमटम यांनी त्यांना खासगी रुग्णालयात हलवले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

कामगार देवासारखी वाट पाहत होते : गाजूल
- आठवडाभर काम केल्यानंतर मंगळवारी होणाºया पगाराकडे सर्वांचे लक्ष असते. विजयादशमीनिमित्त आदल्या दिवशीच कामगार माझी देवासारखी वाट पाहत होते. पगार मिळाला तर कामगार पुढील आठ दिवस दोन घास खातो. अशा परिस्थितीत चोरट्याने हल्ला केला, मी जीवाची परवा करत नव्हतो; मात्र काही झाले तरी कामगारांचा पगार याला द्यायचा नाही अशी जिद्द केली. मी जखमी झालो; मात्र चोरट्यासमोर शरण गेलो नाही अशी प्रतिक्रिया मुनीम भूमेश गाजूल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

Web Title: He suffered four blows but left no labor wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.