इतके वर्षे सत्तेत होता, मराठा आरक्षणासाठी काय केले?"
By राकेश कदम | Published: September 7, 2023 03:42 PM2023-09-07T15:42:37+5:302023-09-07T15:49:29+5:30
राधाकृष्ण विखे पाटील यांचा शरद पवारांना सवाल
राकेश कदम, सोलापूर: उद्धव ठाकरे, शरद पवार तुम्ही मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी काय केलं? इतके वर्ष सत्तेत राहिलात, जाणता राजा म्हणून फिरत राहिला, मात्र आरक्षणासाठी कधी प्रयत्न केले आहेत का?, असा सवाल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापुरात उपस्थित केला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी विखे पाटील आज सोलापुरात आहेत. या दौऱ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
विखे पाटील म्हणाले की, पवारांच्या काळात मराठा बांधवांचे एवढे नुकसान केले आहे की तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. आमचे सरकार याची श्वेतपत्रिका काढणार आहे. त्यावेळेस मराठा बांधवांना खरे कळेल. कर्तृत्वशून्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार होते.त्यांची लक्तर आता वेशीवर टाकली जातील, लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही समाज बांधवांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
जरांगे पाटलांनी आंदोलन ताणू नये!
विखे पाटीलांनी विनंती केली की, मराठवाड्यातील सर्व गावे ही निजाम संस्थानमध्ये होती. त्या भागातील दाखल्यांसाठी महसूल सचिवांच्या नेतृत्वात एक समिती गठीत केली आहे. ज्यांच्याकडे कुणबी मराठ्याचे पुरावे आहेत त्यांना दाखले देण्यास सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटलांची मुख्य हीच मागणी होती. आमची ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची भूमिका आहे. आम्ही जरांगे पाटलांची प्रमुख मागणी पूर्ण केली आहे. जरांगे पाटलांना विनंती आहे त्यांनी जास्त विषय ताणू नये.